धक्कादायक ब्रेकिंग! बुलडाण्यात बर्ड फ्लूची एन्ट्री!! भानखेड येथील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह, प्रतिबंधित क्षेत्रातील पक्ष्यांना दयामरण देणार

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गणराज्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर आज, 26 जानेवारीला अशुभ वार्तेने बुलडाणेकरांच्या काळजात धस्स केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लूने धोक्याचा इशारा देत एन्ट्री केली आहे! यामुळे पशुसंवर्धन विभागासह जिल्हा प्रशासन हाय अलर्ट मोडवर गेले असून, पोल्ट्रीधारक हजारो शेतकरी व व्यावसायिक हादरले आहेत.पोल्ट्रीमध्ये आघाडीवर असलेल्या चिखली तालुक्यातील भानखेड येथे …
 

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गणराज्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर आज, 26 जानेवारीला अशुभ वार्तेने बुलडाणेकरांच्या काळजात धस्स केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लूने धोक्याचा इशारा देत एन्ट्री केली आहे! यामुळे पशुसंवर्धन विभागासह जिल्हा प्रशासन हाय अलर्ट मोडवर गेले असून, पोल्ट्रीधारक हजारो शेतकरी व व्यावसायिक हादरले आहेत.
पोल्ट्रीमध्ये आघाडीवर असलेल्या चिखली तालुक्यातील भानखेड येथे 22 जानेवारीला 200 कोंबड्या एकाएकी दगावल्या होत्या. यामुळे अगोदरपासूनच दक्ष असलेल्या पशुसंवर्धन विभागाने 1 किलोमीटर पर्यंतचे क्षेत्र अलर्ट झोन म्हणून जाहीर केले. तसेच निगराणीसाठी पथके गठीत केली. यातील पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ (मध्यप्रदेश) येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यातील पक्ष्यांचा (कोंबड्या) अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आला. यामुळे आता भानखेड परिसर आता बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. पुंडलिक बोरकर यांनी बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना याची पुष्टी दिली. लवकरच प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व पक्ष्यांना शासनाच्या निर्देशानुसार (एसओपी) दया मरण देण्यात येणार असल्याची खळबळजनक माहितीही त्यांनी दिली, याशिवाय 2 ते 6 किलोमीटर अंतरावरील पक्ष्यांचे व्यापक सर्वेक्षण करण्यात येणार असून, यासाठी 3 पथके गठीत करण्यात आल्याचे ऑन स्पॉट पोहोचून सर्व कारवाईवर सनियंत्रण करणारे उपायुक्त डॉ. बोरकर यांनी स्पष्ट केले. घटनास्थळी एसडीओ राजेश्‍वर हांडे, तहसीलदार अजित येळे, बीडीओ आदी दाखल झाले आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी पशुसंवर्धन विभागाला उपयुक्त सूचना दिल्या असून, प्रजासत्ताकच्या धामधुमीतही ते यावर बारकाईने लक्ष देऊन आहेत.
वैभवाला नजर लागली…
7.40 लाख हेक्टर खरीप पीक लागवडीखालील क्षेत्र, 1.40 लाख हेक्टर रब्बी क्षेत्र, लाखोंच्या संख्येतील पशुधन, लाखोंच्या संख्येतील देशी, ब्रॉयलर कोंबड्या याद्वारे दररोज होणारी लाखोंची उलाढाल असे बुलडाणा जिल्ह्याचे कृषी वैभव आहे. अलीकडच्या दशकात पोल्ट्रीचा पूरक व्यवसाय जिल्ह्यात जोमाने फैलावला असून, त्याने 9664 चौरस कि.मी. क्षेत्रातील 13 तालुक्यांत विस्तार झालाय! पशु खाद्य, अंडी, चिकन, लहान पक्षी यांची रोजची उलढलाच लाखोंच्या घरात जाते. अशा या वैभवाला नजर लागलीय, अशी प्रतिक्रिया धास्तावलेल्या हजारो शेतकरी, व्यावसायिकांमध्ये उमटली आहे.