आजवर 61 हजार रुग्‍ण बरे होऊन परतले घरी! ; आता 6 हजार बाधित घेताहेत उपचार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 5 मे रोजी 648 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याचबरोबर कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा 61586 वर गेला असून, सध्या रुग्णालयांत 6170 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. स्वॅब नमुने संकलन व प्राप्त चाचण्यांचे अहवाल यात घट आल्याने जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 5 मे रोजी 648 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याचबरोबर कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा 61586 वर गेला असून, सध्या रुग्णालयांत 6170 कोरोनाबाधितांवर उपचार  सुरू आहेत.

स्वॅब नमुने संकलन व  प्राप्त चाचण्यांचे अहवाल यात घट आल्याने जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांची संख्या कमी आढळून आली. मात्र मृत्यूचे तांडव कायम असतानाच 24 तासांत 13 रुग्ण दगावल्याने आरोग्य यंत्रणा हादरल्या आहेत! दुसरीकडे सिंदखेड राजा मतदारसंघातील कोविडचे थैमान कायम असल्याने यंत्रणांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.

आज अखेरीस कोरोना बळींची संख्या 434 वर पोहोचली आहे. गत्‌ 24 तासांत त्यात 13 जणांची भर पडली आहे. उपचारादरम्यान तांदुळवाडी (ता. बुलडाणा) येथील 78 वर्षीय पुरुष, पळशी (ता. खामगाव) येथील 55 वर्षीय पुरुष, धनगरनगर शेगाव येथील 46 वर्षीय पुरुष, इंदौर (मध्यप्रदेश) येथील 49 वर्षीय पुरुष,  खामगाव येथील 47 वर्षीय पुरुष, डाबकी रोड, अकोला  येथील  65 वर्षीय महिला, सुटाळा (ता. खामगाव)  येथील 62 वर्षीय पुरुष, (जयपूर ता. मोताळा) येथील 65 वर्षीय पुरुष, निमगाव (ता. नांदुरा) येथील 80 वर्षीय पुरुष, लांजूड (ता. खामगाव) येथील 38 वर्षीय महिला, लोखंडा (ता. खामगाव) येथील 55 वर्षीय महिला, बोरी आडगाव (ता. खामगाव) येथील 65 वर्षीय पुरुष, सूलज (ता. जळगाव जामोद) येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे बळींची संख्या साडेचारशेच्या घरात पोहोचण्याच्या मार्गावर आहे.

जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत कमी आली असली तरी 7 तालुके यातही मागे हटायला तयार नाय! मातृतीर्थमधील कोविडचे थैमान कमी व्हायला तयार नाही. देऊळगाव राजा 118 व सिंदखेडराजा 71 ही संख्या धक्कादायक अशीच ठरावी. संग्रामपूरमध्ये तब्बल 52 पॉझिटिव्ह ही मोठी बातमीच आहे. शेजारील जळगावमध्ये 73 रुग्ण आढळले. खामगाव 57, नांदुरा 47, अशी संख्या आहे. या तुलनेत 6 तालुक्यांतील आकडेवारी आजपुरता तरी दिलासा देणारी आहे. मोताळा 25, लोणार 20, मलकापूर 15, मेहकर 19, चिखली 12 आणि शेगाव 9 असे रुग्ण आढळले. मात्र उद्या हे तालुके तीन आकडी खेळी देखील करू शकतात.

3597 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4211 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3597 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 614 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 309 व रॅपिड टेस्टमधील 305 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 379 तर रॅपिड टेस्टमधील 3218 अहवालांचा समावेश आहे.

6170 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आजपर्यंत 370765 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 61586 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 6960 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 68203 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या  रुग्णालयात 6170 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. आजपर्यंत 447 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.