धक्‍कादायक… नांदुऱ्यात सुरू होता रेमडेसिवीरचा काळाबाजार; तिघांना अटक; 10 इंजेक्शन जप्त

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः रेमडेसीविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची गोपनीय माहिती बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने आज, 5 मे रोजी नांदुरा येथील गैबीनगर परिसरात छापा मारला. या ठिकाणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 10 रेमडेसीविर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. या इंजेक्शनची किंमत 1 लाख 50 हजार रुपये …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः रेमडेसीविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची गोपनीय माहिती बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेला (एलसीबी) मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्‍या पथकाने आज, 5 मे रोजी नांदुरा येथील गैबीनगर परिसरात छापा मारला. या ठिकाणी तिघांना ताब्‍यात घेण्यात आले. त्‍यांच्‍या ताब्‍यातून 10 रेमडेसीविर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. या इंजेक्शनची किंमत 1 लाख 50 हजार रुपये असल्याची माहिती आहे. अन्‍न व औषध प्रशासन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यातच रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे या कारवाईतून पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.

आझाद खाँ इनूस खाँ (31, रा. गैबीनगर नांदुरा), अलबग हुसेन ऊर्फ नुरआलम अबुबकर अंन्सारी (30, रा. खुतरा जि. हजारीबाग झारखंड), शे. इरफान शे. अजमत (20, रा. गैबीनगर, नांदुरा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 10 रेमडेसिवीर इंजेक्शन व 2 मोबाइल असा एकूण 1 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना नांदुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार कोठे कोठे होत आहे,  याची माहिती आरोपींकडून मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या आदेशावरून सहायक पोलीस निरिक्षक विजय मोरे, पोलीस कर्मचारी दीपक पवार, सुधाकर काळे आदींनी केली.

मुळापर्यंत जाऊन सूत्रधाराचा शोध घ्या: मनसेची मागणी

स्‍थानिक गुन्हे शाखेची कारवाई अभिनंदनस्पद असली तरी या प्रकरणाची पाळेमुळे शोधून रॅकेट व त्याचा सूत्रधार यांचा शोध घेण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने केली आहे. मागील दीडेक महिन्यापासून जिल्ह्यात रेमेडिसीविरचा  काळाबाजार सुरू आहे.  या तक्रारींचा ओघ वाढल्यावर व पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी कारवाईचे आदेश दिल्यावर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई कौतुकास्पद असली तरी पकडण्यात आलेले आरोपी प्यादे असू शकतात, तसेच जिल्ह्यातील रेमेडिसीविरच्या काळ्याबाजारामागे सुसज्ज रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया व एलसीबीने त्यादृष्टीने तपास करून यामागील सूत्रधार शोधून काढावे, अशी मागणी जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांनी आज, 5 मे रोजी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांना दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे केली.

आज जिल्ह्यातील रुग्णालयांना 91 रेमडेसिवीरचे वितरण

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत आज, 5 मे रोजी 91 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आल्‍याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्‍या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.

रुग्णालयांना बेड व रुग्ण संख्येनुसार वितरण केलेले रेमडेसिवीर असे ः बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 4 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 3, रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 1, जाधव पल्स हॉस्पीटल 1, सहयोग हॉस्पीटल 1, आशीर्वाद हॉस्पीटल 2, सिद्धीविनायक हॉस्पीटल 3, काटकर हॉस्पीटल 1, शिवसाई हॉस्पीटल 2, संचेती हॉस्पीटल 2, सोळंकी हॉस्पीटल 1, खरात हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 1, सुश्रुत हॉस्पिटल 1, कोठारी हॉस्पीटल 1, चिखली : योगीराज हॉस्पीटल 6, हेडगेवार हॉस्पीटल 3, गुरूकृपा हॉस्पीटल 1, तायडे हॉस्पीटल 2, दळवी हॉस्पीटल 2, पानगोळे हॉस्पीटल 3, खंडागळे हॉस्पीटल 2, गंगाई हॉस्पीटल 1, जैस्वाल हॉस्पीटल 1, श्री गजानन हॉस्पिटल 1 , तुळजाई हॉस्पिटल 1, सावजी हॉस्पीटल 1, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 1, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 1, मुरलीधर खर्चे हॉस्पिटल 1, राईट केअर हॉस्पीटल 1, आशीर्वाद हॉस्पीटल 1, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 4, शेगाव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 2, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 1 , शामसखा हॉस्पीटल 4, खामगाव : चव्हाण हॉस्पीटल 1, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 2, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 3, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 5, मापारी हॉस्पीटल 1, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 1, गोविंद क्रिटीकल 1, श्री गजानन हॉस्पीटल 2, अजंता हॉस्पीटल 1, मेहकर मल्टीस्पेशालीटी 3, राठोड हॉस्पिटल 1, देऊळगाव राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 1, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 1, मी अँड आई हॉस्पीटल 1, सिंदखेड राजा : जिजाऊ हॉस्पीटल 2, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 1 असे एकूण 91 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र पुरवठा झालेल्या इंजेक्शनची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शन चा पुरवठा सुध्दा रुग्णालयांना करण्यात आला आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रुग्णांकरिताच प्राधान्याने वापरण्यात यावा, असेही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.