आमदार रायमूलकरांचे आंदोलन मागे!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करूनही कारवाई न झाल्याने संतापलेल्या आमदार संजय रायमूलकर यांनी थेट धरणाच्या पाण्यातच आज, २१ जूनला सकाळी ११ पासून आंदोलन सुरू केले होते. सायंकाळी पाचपर्यंत आंदोलन चालले. पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी आमदार रायमूलकर यांच्याशी …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करूनही कारवाई न झाल्याने संतापलेल्या आमदार संजय रायमूलकर यांनी थेट धरणाच्या पाण्यातच आज, २१ जूनला सकाळी ११ पासून आंदोलन सुरू केले होते. सायंकाळी पाचपर्यंत आंदोलन चालले. पाटबंधारे विभागाच्‍या अधीक्षक अभियंत्‍यांनी आमदार रायमूलकर यांच्‍याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दोन दिवसांत प्रस्‍ताव शासन दरबारी पाठविण्यात येईल, असे आश्वासन त्‍यांनी दिले. यावेळी ‘पाटबंधारे’चे कार्यकारी अभियंता रायमूलकरांना भेटण्यास आले होते. त्‍यांनीच त्‍यांचे बोलणे अधीक्षक अभियंत्‍यांशी करून दिले. महिनाभरात हा प्रश्न मार्गी न लागल्यास याहीपेक्षा तीव्र स्‍वरुपाचे आंदोलन शेतकरी, महिला, मुला-बाळांना घेऊन २० जुलैला करू, असा इशारा रायमूलकर यांनी यावेळी दिला.

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने सुमारे २७२ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान होत आहे. त्यामुळे २८९ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचनाही दिल्या होत्या. मात्र यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने आमदार संजय रायमूलकर यांनी आज सकाळी धरणाच्या पाण्यातच आंदोलनाला सुरुवात केली.

दरवर्षी शेतकऱ्यांच्या जमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान आहे. शेतकऱ्यांनी आणखी किती काळ आर्थिक झळ सहन करायची. आता काही झाले तरी पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारी अधिकाऱ्यांना धडा शिकविणार आहे. जोपर्यंत कालवा दुरुस्तीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत पाण्यातून बाहेर येणार नसल्याचा इशारा आमदार रायमूलकर यांनी दिला होता. त्‍यामुळे पाटबंधारे विभागात खळबळ उडाली होती. कार्यकारी अभियंत्‍यांनी तातडीने मुंबईला गेलेल्या अधीक्षक अभियंत्‍यांशी चर्चा करून आंदोलनाची माहिती दिली. त्‍यानंतर ते स्वतः पेनटाकळी प्रकल्‍पावर रायमूलकरांशी चर्चा करण्यास गेले. या ठिकाणी त्‍यांची समजूत काढत अधीक्षक अभियंत्‍यांशी त्‍यांचे बोलणेही करून दिले.