नांदुऱ्याच्‍या तहसीलदारांना जीवंत जाळून टाकण्याची धमकी!; वाळूमाफियांची मुजोरी वाढली!; अवैध रेती वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला!

नांदुरा ( प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांसह पथकावर वाळूमाफियांनी हल्ला चढवला. पुन्हा नदीपात्रात कारवाईसाठी आले तर अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकू, अशी धमकीही तहसीलदारांना देण्यात आली. ही खळबळजनक घटना कोदरखेड (ता. नांदुरा) काल, 29 मार्चला सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेने तालुक्यातील वाळूमाफियांची दादागिरी …
 

नांदुरा ( प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवैधरित्‍या रेती उत्‍खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांसह पथकावर वाळूमाफियांनी हल्ला चढवला. पुन्‍हा नदीपात्रात कारवाईसाठी आले तर अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकू, अशी धमकीही तहसीलदारांना देण्यात आली. ही खळबळजनक घटना कोदरखेड (ता. नांदुरा) काल, 29 मार्चला सकाळी साडेअकराच्‍या सुमारास घडली. या घटनेने तालुक्‍यातील वाळूमाफियांची दादागिरी पुन्‍हा एकदा समोर आली असून, यांना एवढी मुजोरी येण्यासाठी कुणाचा राजकीय आश्रय लाभतो, याचा शोध प्रशासनाने घेण्याची गरज आहे.

कोदरखेड शिवारातील पूर्णा नदीपात्रात अवैध रेती व गौण खनिजाची वाहतूक व उत्खनन सुरू असल्याची माहिती  तहसीलदार राहुल तायडे यांना मिळाली. त्‍यांनी तातडीने मंडळ अधिकारी अनिल रामभाऊ जोशी, तलाठी अभिजित प्रभाकर आमले यांच्‍यासह नदीपात्राकडे धाव घेतली. ट्रॅक्‍टरचालक महेश पाटील (रा. दादुलगाव, ता. जळगाव जामोद) ट्रॅक्टरमध्ये इतर मजुरांकडून रेती भरून घेत होता. त्‍याला पकडून रेती वाहतुकीच्‍या परवान्याची मागणी केली असता त्‍याच्‍याकडे परवाना नसल्याचे त्‍याने सांगितले. त्याने ट्रॅक्‍टरमालकाला फोन करून नदीपात्रात बोलावून घेतले. दोन मोटरसायकलवर (क्र. एमएच 28 बीएल 3644 व एमएच 28 बीएच 4708) त्‍याचा मालक पैसोडे व सोबत एक व्यक्ती नदीपात्रात आला. त्यांनी आल्या आल्या तुम्ही कोण, अशी विचारणा केली. त्‍यांना तहसीलदारांनी ओळख करून दिली व अवैध रेती वाहतुकीबद्दल कारवाई करत असल्याचे सांगितले. ट्रॅक्‍टर तहसील कार्यालयात घेऊन चला, असे सांगितले. त्‍यावर पैसोडे (रा. दादुलगाव, ता. जळगाव जामोद) व इतरांनी तुमच्‍यात ताकद असेल तर ट्रॅक्टर अडवून दाखवा, असे म्हटले. पुन्‍हा नदीपात्रात आले तर अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकू,  अशी धमकी देत धक्काबुक्की करून ट्रॅक्टर घेऊन पळून गेले. ट्रॅक्‍टरमध्ये 1 ब्रास रेती (किंमत 3100 रुपये) होती. ते सर्व 7 ते 8 लोक असल्यामुळे त्यांना तहसीलदार व त्‍यांचे सहकारी रोखू शकले नाहीत. चालक महेश पाटील व मालक पैसोडे यांच्‍यासह 8 ते 10 लोकांविरुद्ध तहसीलदारांनी शासकीय कामात अडथळा, धक्‍काबुक्‍की व जीवे मारण्याच्‍या धमकीची तक्रार केली आहे. या व्‍यक्‍तींविरुद्ध मोका कायद्याअंतर्गत कारवाई व गुन्‍हे दाखल करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.