नाना गटबाजी आहे की नाही? आता तुम्‍हीच सांगा!; चव्‍हाट्यावर आलेल्या गटबाजीने नानाही हैराण!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कालपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. पक्ष कार्यकर्त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची माहिती आणि संघटनाचा आढाव्यासाठी ते जिल्ह्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा असल्याने पक्षातील गटबाजीचे दर्शन घडणार नाही, याची काळजी घेण्याची गरज होती, मात्र तसे घडले नाही. पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर, व्यासपीठावरील सर्व नेत्यांकडे अंगुलीनिर्देश करून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कालपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. पक्ष कार्यकर्त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची माहिती आणि संघटनाचा आढाव्‍यासाठी ते जिल्ह्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्‍यांचा पहिलाच दौरा असल्याने पक्षातील गटबाजीचे दर्शन घडणार नाही, याची काळजी घेण्याची गरज होती, मात्र तसे घडले नाही. पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर, व्‍यासपीठावरील सर्व नेत्‍यांकडे अंगुलीनिर्देश करून हम साथ साथ हैं…असे नानांनी म्‍हटले खरे; पण त्‍यानंतर पक्षाच्‍याच बैठकीत गटबाजी असल्यावर शिक्कामोर्तब झाले. असमन्वयाचा अभाव दिसता कामा नये, असा सल्ला देत यापुढे बंद खोलीतील चर्चा बाहेर येता कामा नये, अशी सूचनाच त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली. त्‍यावर कडी करत संजय राठोड यांनी तुम्‍ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार व्‍हाल तर आम्‍ही आपसातील गटबाजी विसरून तुम्‍हाला मुख्यमंत्री बनवू, असे म्‍हटल्याने गटबाजी आहे, हे त्‍यांनीही दाखवून दिले. त्‍यामुळे नानाही हैराण झाले असतील यात शंका नाही.

काल संध्याकाळी मेहकर शहरापासून सुरू झालेला नाना पटोलेंचा जिल्हा दौरा आज, 10 जूनला संध्याकाळपर्यंत चालणार आहे. काल मेहकर आणि चिखली या दोन मतदाररसंघांचा दौरा आटोपून नाना रात्रीच बुलडाणा येथे दाखल झाले. आज सकाळी त्यांनी काँग्रेस नेत्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तिथे जिल्हाधिकाऱ्यांसोबत कोरोना महामारी, कृषी कर्जवाटप, खरीप हंगाम पूर्वतयारी याबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. नंतर तिथेच जिल्हा नियोजन भवनात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत नेहमीप्रमाणे केंद्र सरकारवर टीका केली. वाढती महागाई, कोरोना संकटावरून केंद्र सरकारवर शरसंधान साधले.

जिल्हा काँग्रेसमधील गटबाजीबद्दल प्रश्न विचारला असता त्‍यांनी, इथे तुम्हाला कोणती गटबाजी दिसते? सगळे नेते तर सोबत आहे, असे ठासून सांगितले. मात्र त्यानंतर काँग्रेस भवनात झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत ‘यापुढे मला तुमच्यात समन्वयाचा अभाव दिसता कामा नये. एकत्र बंद खोलीत बसून चर्चा करू. आपल्यातली चर्चा आपल्यात ठेवा. पुढील वेळी मला गटबाजी संदर्भात उत्तर देण्याची वेळ येऊ देऊ नका, असे पदाधिकाऱ्यांना सुनावले. त्यानंतर लगेच आभार मानताना प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनी गटबाजीवर शिक्कामोर्तब करण्याचे काम केले. नाना पटोले हे 2024 चे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. नाना तुम्ही जर मुख्यमंत्री होणार असाल तर आम्ही आपसातील गटबाजी विसरून तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, असे त्‍यांनी सांगितले. अनेक दिवसांपासून सतत जिल्हाध्यक्ष बदलाची मागणी काँग्रेसच्या एका गटाकडून होत आहे. त्यामुळे या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची समजूत पटोले कशी काढतात, जिल्हा काँग्रेसच्या संघटनेत बदल होणार का, या प्रशांची उत्तरे लवकरच समोर येतील.