निरव शांतता, सुनसान रस्ते अन्‌ ठप्प व्यवहार! जनता कर्फ्यूमधील चित्र

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः किमान 15 तास चालणारी भरगच्च वाहतूक, अधूनमधून होणारे ट्राफिक जाम, गजबजणारे मार्केट, ग्राहकांची उसळणारी गर्दी अन् दररोज होणारी लाखोंची उलाढाल हे चित्र आज, 27 फेब्रुवारीला बुलडाणा शहरातून एकदम गायब झाले! त्याऐवजी सुनसान रस्ते, घाबरत जाणारे एकटे दुकटे वाहन, निरव शांतता, चौकाचौकात तैनात पोलीस दादा अन् ठप्प झालेले लाखोंचे व्यवहार, उलाढाल असे चित्र …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः किमान 15 तास  चालणारी भरगच्च वाहतूक, अधूनमधून होणारे ट्राफिक जाम,  गजबजणारे मार्केट, ग्राहकांची उसळणारी गर्दी अन्‌ दररोज होणारी लाखोंची उलाढाल हे चित्र आज, 27 फेब्रुवारीला बुलडाणा शहरातून एकदम गायब झाले! त्याऐवजी  सुनसान रस्ते, घाबरत जाणारे एकटे दुकटे वाहन, निरव शांतता, चौकाचौकात तैनात पोलीस दादा अन्‌ ठप्प झालेले लाखोंचे व्यवहार, उलाढाल असे चित्र आटपाट बुलडाणा नगरीत पहावयास मिळाले. कारण ठरली ती कडक संचारबंदी!

सरत्या वर्षात कोरोना ऊर्फ कोविड कृपेने सुमारे 1 लाख बुलडाणेकर कडक संचारबंदी, लॉकडाऊन अशा सर्वच संकटांना सरावलेले आहेत. त्यामुळे मागच्या तुलनेत (खूपच) सौम्य असलेल्या या कर्फ्यूसाठी जनता स्वेच्छेने तयार झाली. ‘खाकी’ ने देखील जास्त ( स्टार्च सारखा)कडकपणा  दाखविला नाही की कुणाला ( दंडुक्याचा) प्रसाद ही दिला नाय! इकबाल चौक, जनता चौक, जयस्तंभ चौक, कारंजा परिसर, संगम चौक, जांभरून रोड, अजिंठा रोड, तहसिल चौक प्रमाणेच अत्र, तत्र ,सर्वत्र हेच दृश्य- चित्र दिसून आले. जनता कर्फ्यूचा पार्ट 2 देखील हिट झाला हीच संध्याकाळाची ब्रेकिंग न्यूज ठरली!

बुलडाणेकरांनी संचारबंदी दरम्यान दाखवलेली शिस्त प्रशंसनीय आहे. आज संचारबंदी दरम्यान बुलडाणेकरांनी संयम दाखविला. व्यापारी, छोटे दुकानदार यांच्यासहीत सामान्य नागरिकांनीही संचारबंदीचे उत्स्फूर्त पालन केले. असाच संयम आणखी काही दिवस दाखविल्यास कोरोना हद्दपार झालेला असेल.

-महेश वाघमोडे,मुख्याधिकारी नगर परिषद, बुलडाणा