निषेधाऐवजी गायकवाडांना समर्थन मिळत असल्याने महाराज मंडळी गार!; आज धमकी देणारे महाराज शिव्‍यांत न्‍हाले!

बुलडाणा (मनोज सांगळे मो. 9822988820ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उपासतापास बंद करा. रोज 4 अंडी खा, दिवसाआड मांसाहार करा… जान है तो जहांन है… प्रोटिनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे… असे आवाहन बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केल्यामुळे ‘खवळलेल्या’ वारकरी सांप्रदायातील काहींनी आमदार संजय गायकवाड यांना कॉल करून त्यांच्या वक्तव्यामुळे धर्माची बदनामी झाल्याचा आव आणला. तेवढ्यावरच …
 

बुलडाणा (मनोज सांगळे मो. 9822988820ः  बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः उपासतापास बंद करा. रोज 4 अंडी खा, दिवसाआड मांसाहार करा… जान है तो जहांन है… प्रोटिनयुक्‍त आहार घेणे आवश्यक आहे… असे आवाहन बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केल्‍यामुळे ‘खवळलेल्या’ वारकरी सांप्रदायातील काहींनी आमदार संजय गायकवाड यांना कॉल करून त्‍यांच्‍या वक्‍तव्‍यामुळे धर्माची बदनामी झाल्‍याचा आव आणला. तेवढ्यावरच न थांबता माफी मागण्याचा आग्रह धरला. आमदारांनी ते आवाहन कुणासाठी, कशासाठी केले हे वारंवार सांगूनही सतत सुरू असलेल्या कॉल्समुळे आणि त्‍यावरून वारंवार डिवचले जात असल्याने संतापून त्‍यांनी महाराज मंडळींचा उद्धारही केला. एवढ्यावर हे प्रकरण थांबले नाही. आज, 13 मे रोजी एका महाराजाने चक्‍क धमकीची भाषा वापरल्यानंतर, गायकवाडांनी मग त्‍याला शिव्यांनी न्‍हावू घातले!

आमदार गायकवाडांनी कार्यकर्ते, समर्थकांना केलेले आवाहन एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर, बुलडाण्यातील एका ‘कट्टर’ विरोधक नेत्‍याने आयती ‘संधी’ लाभल्‍याचे ओळखून त्‍याचा ‘इश्यू’ केला. वारकरी सांप्रदायातील काही मंडळींना ‘पेटवून’ दिले. वारंवार डिवचले की गायकवाडांनी खवळणे या नेत्‍याला अपेक्षित होते. तसे ते घडलेही. मात्र वारकऱ्यांच्‍या भूमिकेला जनसमर्थन लाभले नाही. बुलडाणा लाइव्‍हनेही काल तटस्‍थ भूमिका घेऊन या विषयावर बातमी दिली. सध्याच्‍या वातावरणात हा वाद जाणूनबुजून पेटविला जात असल्याचे कालच बुलडाणा लाइव्‍हने ठामपणे मांडले होते. कॉल करायचा, डिवचायचे आणि तो कॉल व्हायरल होईल याची व्यवस्‍था करायची, असे सारे गणित काही मंडळींनी मांडल्‍याचे काल दिसून आले. मात्र घडले उलटच. महाराजांना बोलल्याबद्दल सामान्य जनतेतून निषेध व्‍यक्‍त होण्याऐवजी गायकवाडांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर समर्थन प्राप्‍त झाले. गायकवाडांनी मांडलेली भूमिका योग्‍य आहे आणि त्‍याचा हिंदूत्‍वाचा काहीएक संबंध नाही, हेही जनतेनेच महाराज मंडळींना ठणकावून सांगितल्यानंतर महाराज मंडळी अक्षरशः गार झाल्याचे दिसून येत आहे.

प्रशांत महाराजांनी गाठले गायकवाडांचे कार्यालय…

काल संजय गायकवाडांना फोन करून ‘व्‍यक्‍त’ होणाऱ्या प्रशांत महाराजांनी आज आपल्या ‘भावना’ गुंडाळल्‍याचे दिसून आले. त्‍यांनी गायकवाड यांच्‍या कार्यालयात येऊन हे प्रकरण कशापद्धतीने चुकीचे रंगवले गेले आणि त्‍याचा फायदा कुणी उचलला, हे सांगितले. आपण हे प्रकरण इथेच संपवत असून, वारकरी मंडळींनीही गायकवाडांना यापुढे या विषयावर कॉल करू नये, असे आवाहनही त्‍यांनी केले.

ते महाराज शिव्यांत न्‍हाले…

तुम्‍ही माफी मागायला पाहिजेत, असे बोलायला नाही पाहिजेत…असे अकोल्याच्‍या एक महाराजांनी गायकवाडांना कॉल करून सुनावले. त्‍यावर गायकवाडांनी 31 मे रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीवर सर्व महाराज मंडळी या मी चर्चा करतो, असे सांगितले. महाराज त्‍यावर म्‍हणाले, की सिंदखेड राजाला 31 मे ला कशाला, उद्या परवा सांगा कुठे यायचे… (विशेष म्‍हणजे सध्या जिल्हाबंदी आहे आणि बुलडाणा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे.) या धमकीयुक्‍त भाषेमुळे खवळलेल्या गायकवाडांनी मग या महाराजांना अक्षरशः शिव्यांच्‍या पावसात बसवले व फोन कट केला.

वाद रंगविण्याऐवजी जनजागृती करा…

गायकवाडांना कॉल करणे, माफी मागण्याची मागणी करणे यासाठी जणू काही लोकांमध्ये स्‍पर्धा लागली आहे. अशी स्‍पर्धा करून वाद वाढविण्यापेक्षा या मंडळींनी कोरोनाबद्दल जनजागृती करण्याची खरेतर गरज आहे. राजकीय नेत्‍याचा उपदेश (मग तो आरोग्‍यादृष्टीने कसा का असेना) एकवेळ कुणी ऐकणार नाही. पण महाराज मंडळींच्‍या उपदेशाला समाजात गांभीर्याने घेतले जाते. त्‍यामुळे जी मंडळी आजघडीला नको त्‍या विषयावर हवा देण्याचा प्रयत्‍न करतेय, त्‍यांनी हे करण्यापेक्षा कोरोना जनजागृतीत वेळ घालवायला हवा, अशी संतप्‍त भावना आज अनेकांनी बुलडाणा लाइव्‍हकडे व्‍यक्‍त केली.