निसर्ग कोपला! गारपिटीने शेतकऱ्यांच्‍या स्‍वप्‍नांचे मातेरे… फळबागा, उन्‍हाळी पिके उद्‍ध्वस्‍त, पंचनाम्‍यांनाही मिळेना मुहूर्त!; खामगाव, मेहकर तालुक्‍यातील भयंकर चित्र

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज कडक लॉकडाऊनची धामधूम आहे. प्रशासनाकडून लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी उपाययोजना सुरू असताना, सामान्यांची दहा दिवस पुरेल इतका किराणा आणि गरजेचे साहित्य घरी आणून ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. या सर्व गदारोळात ते बिचारे शेतकरी हताश-निराश होऊन बसले आहेत. अस्मानी संकटाने त्यांना अक्षरशः हादरवून टाकले आहे. …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज कडक लॉकडाऊनची धामधूम आहे. प्रशासनाकडून लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी उपाययोजना सुरू असताना, सामान्यांची दहा दिवस पुरेल इतका किराणा आणि गरजेचे साहित्‍य घरी आणून ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. या सर्व गदारोळात ते बिचारे शेतकरी हताश-निराश होऊन बसले आहेत. अस्‍मानी संकटाने त्‍यांना अक्षरशः हादरवून टाकले आहे. त्‍यांच्‍या स्‍वप्‍नांचे मातेरे झालेच आहे, पण त्‍यातून सावरायचे कसे, या विचारांनी ते भांबावले आहेत. काल, 10 मे रोजी दुपारी साडेतीन- चारच्‍या दरम्‍यान अर्ध्या तासात त्‍यांच्‍यावर निसर्गाने कोप केला आहे. त्‍यांच्‍या शेतातील फळपिके उद्ध्वस्‍त केली आहेत. खामगावच्‍या पिंप्री कोर्डे आणि मेहकरच्‍या घाटबोरी भागातील झालेल्या गारपिटीचे हे विध्वंसक चित्र आहे.

काल, 9 मे रोजी दुपारी साडेतीन ते चारच्‍या दरम्‍यान सोसाट्याचे वारे वाहू लागले, त्‍याचबरोबर पावसाच्‍या टपोऱ्या थेंबाने हजेरी लावत जोर वाढवला. काही वेळातच गारपिट सुरू झाली. अनेक शेतकरी खरीपाच्‍या कामासाठी शेतात होते. त्‍यांनी आडोसा शोधून गारपिटीपासून बचाव केला. पण ज्‍यांच्‍या शेतात फळपिके आणि उन्‍हाळी पिके होती, ती पार झोपून गेली आहेत. फळपिके कोलमडून पडली आहेत. ‘बुलडाणा लाइव्‍ह’शी बोलताना पिंप्री कोर्डे येथील शेतकरी भागवत लवांद यांनी सांगितले, की मी 2 एकरात पपईची लागवड केली होती. सध्या फळधारणा झाली होती. आजपर्यंत मोठा खर्च झाला असून, गारपिटीने या सर्व खर्चाबरोबरच मेहनत आणि त्‍यातून येणाऱ्या उत्‍पादनाच्‍या स्‍वप्‍नालाही तडाखा दिला आहे. सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ते म्‍हणाले. याच भागातील अजय जगन्‍नाथ शेळके यांच्‍या शेतातील शेडनेटचेही नुकसान झाले. काकडी, उन्‍हाळी ज्‍वारी, आंब्‍याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे मेहकर तालुक्‍यातील घाटनांद्रा येथील श्याम राठोड, विजय राठोड, पंजाबराव देशमुख, गणेश हिरडकर, सुरेश पंडित यांनी सांगितले. या पिकाच्‍या भरवशावर या शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन केले होते. मात्र ही पिकेच नष्ट झाल्याने पुन्‍हा बँकेसमोर हात पसरण्याशिवाय त्‍यांच्‍याकडे पर्याय नाही. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हे शेतकरी हवालदिल झाल्याचे पहायला मिळाले.

पंचनामे कधी, मदत कधी??

गारपिटीने उद्‌ध्वस्‍त केले असले तरी, या शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळेलच याची शाश्वती नाही. कारण यापूर्वी अवकाळीने केलेल्या पिकांची नुकसान भरपाईच अद्याप जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्‍यात पुन्‍हा झालेल्‍या या नुकसानीच्‍या पंचनाम्‍यासाठी आज, 10 मे रोजीही महसूल अधिकारी, कर्मचारी वारंवार शेतकऱ्यांनी फोन करूनही आले नव्‍हते. याबाबत पिंप्री कोरडे येथील तलाठी शारदा पवार यांना बुलडाणा लाइव्‍हने संपर्क केला असता, त्‍यांची आरटीपीसीआर चाचणी केल्याने त्‍याचा अहवाल येईपर्यंत कुठेच जाता येणार नसल्याचे त्‍या म्‍हणाल्या. मात्र कृषी सहायकांना शेतकऱ्यांचे फोन आल्याचे कळवल्‍याचे त्‍यांनी सांगितले. पंचनामे कधी होतील, नंतर अहवाल कधी जातील आणि मदत कधी मिळेल, सारेच यंत्रणेच्‍या भरवशावर असल्याने शेतकऱ्यांच्‍या हातात आभाळभूत नजरेने पाहण्याशिवाय सध्यातरी काहीच नाही.

तातडीने पंचनाम्‍यांची गरज…

खरीप हंगामच या पिकांवर अवलंबून असल्याने या शेतकऱ्यांच्‍या नुकसानीचे पंचनामे तातडीने होण्याची गरज आहे. याकडे कृषी विभाग आणि महसूत्र यंत्रणेच्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.