पती-पत्‍नीच्या भांडणात “मध्यस्‍थी’ जिवावर बेतली!; पतीने पोटात खंजीर खुपसल्याने तरुणाची मृत्‍यूशी झुंज सुरू, मेहकर शहरातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पती- पत्नीच्या वादात मध्यस्थी करणे शेजारच्या तरुणाला जिवावर बेतले आहे. खंजीर खुपसून त्याच्यावर बापलेकाने हल्ला केला. ही घटना ११ सप्टेंबरच्या रात्री साडेआठला सुमारास मेहकर शहरातील पैनगंगानगरात घडली. याप्रकरणी हल्लेखोर बापलेकाविरुद्ध आज, १४ सप्टेंबर रोजी मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यातील गंभीर जखमी आसिफ शहा मकबूल शहा (३०) याच्यावर सध्या …
 
पती-पत्‍नीच्या भांडणात “मध्यस्‍थी’ जिवावर बेतली!; पतीने पोटात खंजीर खुपसल्याने तरुणाची मृत्‍यूशी झुंज सुरू, मेहकर शहरातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पती- पत्नीच्या वादात मध्यस्थी करणे शेजारच्या तरुणाला जिवावर बेतले आहे. खंजीर खुपसून त्‍याच्‍यावर बापलेकाने हल्ला केला. ही घटना ११ सप्टेंबरच्‍या रात्री साडेआठला सुमारास मेहकर शहरातील पैनगंगानगरात घडली. याप्रकरणी हल्लेखोर बापलेकाविरुद्ध आज, १४ सप्टेंबर रोजी मेहकर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

हल्ल्यातील गंभीर जखमी आसिफ शहा मकबूल शहा (३०) याच्यावर सध्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आसिफने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्याच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर सलीम शाह कुटुंबासह राहतात. ते आसिफचे दूरचे नातेवाइक आहेत. सलीम शाह त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी तिला मारहाण करायचा, असे आसिफने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. १० सप्टेंबर रोजी सलीम शाह याच्या घरात त्याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी आसिफने मध्यस्थी केली व भांडण करू नको, असे समजाविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आसिफ त्याच्या वडिलांसह घरासमोर उभा होता. त्यावेळी सलीम शाह तिथे आला. त्याने पांढऱ्या रुमालात लपवून आणलेली खंजीर आसिफच्या पोटात खुपसली. त्यामुळे गंभीर जखमी आसिफ रक्ताच्या थारोळ्यात पडला.

यावेळी सलीमचा मुलगा शाहीदने देखील सलीमला मदत केली. जखमी आसिफला त्याचे वडील व लहान भाऊ वाचवायला आले असता “तुझे तो मैने जान सें मारा अब तेरे भाई और पिताजी को भी जानसे मार दूंगा’ अशी धमकी सलीमने दिली व तो पळून गेला. जखमी आसिफला मेहकर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. आज त्याच्या जबाबावरून मेहकर पोलीस ठाण्यात सलीम शाह (४५) व शाहीद शाह सलीम शाह (२०, दोघेही रा. पैनगंगानगर, मोळा रोड, मेहकर) या पितापुत्रांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.