पत्नीच्या छळाला कंटाळून घरजावई युवकाने घेतला गळफास!

दहा दिवस उलटूनही पोलीस करेनात कारवाई; नातेवाइकांचा आरोप बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पैशाची मागणी करत पत्नी, सासू आणि मेव्हण्याकडून मारहाण व छळ होत असल्याने युवकाने 9 जानेवारीला आत्महत्या केल्याची तक्रार किनगाव राजा पोलीस ठाण्यात त्याच्या आईने दिली आहे. मात्र दहा दिवस उलटूनही अद्याप आरोपींवर कारवाई झाली नसल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबियांनी केला आहे. रवींद्र बाजीराव …
 

दहा दिवस उलटूनही पोलीस करेनात कारवाई; नातेवाइकांचा आरोप

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पैशाची मागणी करत पत्नी, सासू आणि मेव्हण्याकडून मारहाण व छळ होत असल्याने युवकाने 9 जानेवारीला आत्महत्या केल्याची तक्रार किनगाव राजा पोलीस ठाण्यात त्याच्या आईने दिली आहे. मात्र दहा दिवस उलटूनही अद्याप आरोपींवर कारवाई झाली नसल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबियांनी केला आहे.

रवींद्र बाजीराव गवई (35, रा. जांभोरा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप रवींद्रची आई देऊबाई गवई यांनी त्याची पत्नी वर्षा, सासू शोभा भगवान खरात व मेव्हणा शरदवर ठेवला आहे. त्यांनी 10 जानेवारीला किनगाव राजा पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दिली. रवींद्रचे लग्न वर्षासोबत 2009 मध्ये झाले होते. तो घरजावई म्हणून राहत होता. मात्र पत्नी, सासू, मेव्हणा त्याला पैशासाठी छळत होते, मारहाण करत होते. भेटायला यायचा तेव्हा रवींद्र छळ होत असल्याचे सांगायचा, असे त्याच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. 9 जानेवारीला त्याने घरातच गळफास घेतला. आत्महत्येनंतर दुसर्‍या दिवशी त्याच्या आईने तक्रार दिली. मात्र पोलिसांनी अद्याप कोणाविरुद्धही कारवाई केली नाही, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.