पत्‍नीला घरातून हाकलून देत आणून ठेवली “ज्‍योती’!; मेहकरमध्ये पती, सासूसह त्‍या बाईविरुद्धही गुन्‍हा दाखल!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पैशांसाठी घराबाहेर काढल्यानंतर पतीने दुसरी बाई घरात ठेवली. ऐकिव माहितीवर विश्वास न ठेवता पत्नीने घरात येऊन पाहिले तर खरंच ज्योती नावाची एक बाई घरात दिसली. तिला तू इथे कशी, असे विचारले तर तिने मारहाण केल्याची तक्रार पत्नीने मेहकर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी पती, सासू आणि घरी आणून ठेवलेल्या ज्योतीविरुद्ध …
 
पत्‍नीला घरातून हाकलून देत आणून ठेवली “ज्‍योती’!; मेहकरमध्ये पती, सासूसह त्‍या बाईविरुद्धही गुन्‍हा दाखल!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पैशांसाठी घराबाहेर काढल्‍यानंतर पतीने दुसरी बाई घरात ठेवली. ऐकिव माहितीवर विश्वास न ठेवता पत्‍नीने घरात येऊन पाहिले तर खरंच ज्‍योती नावाची एक बाई घरात दिसली. तिला तू इथे कशी, असे विचारले तर तिने मारहाण केल्याची तक्रार पत्‍नीने मेहकर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी पती, सासू आणि घरी आणून ठेवलेल्या ज्‍योतीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. वर्षा गौतम मोरे हिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे २००९ मध्ये वाशिम जिल्ह्यातील गौतम ज्ञानबा मोरे याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर ४-५ वर्षे तिला चांगले वागविले. त्यानंतर मात्र तू चांगली दिसत नाही. घरातील काम येत नाही. आम्हाला तुझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळाली असती, असे टोमणे सासरकडील लोक मारू लागले. किराणा दुकान टाकण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणायला तिला सांगितले. तिच्या आई- वडिलांनी कसाबसा पैशाचा मेळ जमवून दोन लाख रुपये दिले. त्यानंतर गौतमने किराणा दुकान टाकले. पुन्हा एक- दोन वर्षे वर्षाला चांगले वागविले. काही दिवसांनंतर पुन्हा शेतात बोअर घेण्यासाठी १ लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा छळ सुरू झाला.

नोव्हेंबर २०१९ मध्ये पती व सासूने तिला घराबाहेर काढून दिल्याने ती माहेरी आली. त्यानंतर वाद आपसात करून पुन्हा वर्षाला नांदवायला घेऊन गेले. सासरी गेल्यावर तिचा पुन्हा छळ सुरू झाला. माहेरवरून पैसे आणले नाही तर तुला फारकती देऊन टाकू. जिवाने मारून टाकू, अशी धमकी देत तिला पुन्हा घराबाहेर काढले. माहेरी मेहकर येथे आलेल्या वर्षाला माहिती मिळाली, की तिच्या नवऱ्याने घरात एका दुसऱ्या बाईला ठेवून घेतले आहे. तिने १८ मे रोजी सासरी जाऊन बघितले असता घरात एक ज्योती नावाची बाई होती. तू इथे माझ्या घरात कशाला आली, असे वर्षाने ज्योतीला विचारले असता तुला काय करायचे, असे म्हणत ज्योतीने तिला मारहाण केली. घराबाहेर हाकलले व पुन्हा इथे आली तर जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. असे वर्षाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून वर्षाचा पती गौतम ज्ञानबा मोरे, सासू गोदावरी ज्ञानबा मोरे व वर्षाच्या नवऱ्याने घरात ठेवलेल्या ज्योती नावाच्या बाईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.