परवानगी नसताना खासगीवाले रॅपिड टेस्‍ट करतातच कशी?; बुलडाण्यात सर्रास लुटीचा धंदा; रॅपिडचा रेट 1200 पर्यंत! प्रशासन म्‍हणाले, पैसे देण्याची गरज नाही, चाचण्या सरकारी यंत्रणेकडे मोफत!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. थोडाही ताप आला की लगेच टेस्ट करण्याकडे कल वाढला आहे. याच भीतीचा फायदा खासगी लॅबचालकांनी घेणे सुरू केले आहे. बुलडाणा शहरातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात खासगी लॅबमध्ये रॅपिड किंवा आरटीपीसीआर टेस्ट करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. असे …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने नागरिकांच्‍या मनात दहशत निर्माण झाली आहे. थोडाही ताप आला की लगेच टेस्‍ट करण्याकडे कल वाढला आहे. याच भीतीचा फायदा खासगी लॅबचालकांनी घेणे सुरू केले आहे. बुलडाणा शहरातच नव्‍हे तर पूर्ण जिल्ह्यात खासगी लॅबमध्ये रॅपिड किंवा आरटीपीसीआर टेस्‍ट करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. असे असतानाही काही खासगी लॅबचालकांनी रॅपिड टेस्‍टचा बाजार मांडल्याच्‍या तक्रारी बुलडाणा लाइव्‍हकडे प्रतिष्ठित नागरिकांनी केल्या आहेत.

रॅपिड टेस्टसाठी 1200 रुपयांपर्यंत आकारले जात आहेत. विशेष बाब म्हणजे खासगी लॅबमध्ये तपासणी करणाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास जिल्हा यंत्रणेला कळवले जात नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण कोरोना रुग्णवाढीसाठी कारणीभूत तर ठरत नाहीत ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्‍हणाले, की  जिल्ह्यात कोणत्याही खासगी लॅबला कोविडची रॅपिड आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्याची परवानगी दिलेली नाही. अशा पद्धतीने कुणी तपासण्या करून रुग्णांची लूट करत असतील तर त्यांचेवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. बुलडाणा लाइव्‍हकडे आलेल्या तक्रारीत एका प्रतिष्ठित राजकीय नेत्‍यांनी सांगितले, की बुलडाणा शहरातील एका नामांकित लॅबमध्ये रॅपिड टेस्‍ट करण्यात आली. त्‍यात पॉझिटिव्‍ह आलो. पण खात्री न वाटल्याने आरटीपीसीआर टेस्‍ट करवून घेतली. मात्र त्‍याचा रिपोर्ट येण्यासाठी 5 दिवस लागतील, असे सांगितले. हा उशिर कोरोना वाढीस कारणीभूत तर ठरत नाही ना, याचा शोध यंत्रणेने घेण्याची गरजही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

अहवाल उशिरा का येतात?

स्‍वॅब दिल्यानंतर रिपोर्ट येण्यास 4-5 दिवसांचा कालावधी लागत असल्याने या काळात जर ती व्‍यक्‍ती खरोखरच पॉझिटिव्‍ह असेल आणि इकडे तिकडे फिरत असेल तर किती लोकांना त्‍या माध्यमातून बाधा होत असेल, हा मोठा धोका आहे. होम क्‍वारंटाइन राहण्यास सांगितले जात असले तरी रुण घरी राहीलच याची शक्‍यता कमीच आहे. अहवाल उशिरा मिळण्याच्‍या कारणा संदर्भात पडताळणी केली असता, कोविड सेंटरवर झालेले स्वॅब कलेक्शन शासकीय प्रयोगशाळेत विलंबाने पोहोचत असल्याचे समोर आले आहे. घेतलेले स्वॅब हे 24 तासांच्या आत प्रयोगशाळेत पोहोचविण्यात यावे, अशा सूचना यापूर्वीच पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी कोविड सेंटरला दिल्या होत्या. मात्र त्या निर्देशांचे गांभीर्याने पालन होत नसल्याचे समोर आले आहे. प्रयोगशाळेत स्वॅब आल्यानंतर आम्ही 24 तासांत अहवाल देतो असे प्रयोगशाळेच्या वतीने सांगण्यात आले.

नागरिकांनी प्रशासनाच्‍या निदर्शनास आणून द्यावे…

जिल्ह्यात रॅपिड टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्टसाठी पुरेशा किट जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. शासकीय कोविड सेंटरवर या तपासणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे विनाकारण खासगी लॅबकडे कुणीही तपासणी करू नये. कुणी तशा तपासण्या करत असेल तर जागरूक नागरिक म्हणून प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना जिल्‍हा शल्य चिकित्‍सक डॉ. नितीन तडस यांनी सांगितले.

आज एक कोरोना बळी, 1130 नवे रुग्‍ण

दरम्‍यान आज, 27 मार्चला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5433 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4279 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1130 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 782 व रॅपिड टेस्टमधील 348 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 889 तर रॅपिड टेस्टमधील 3390 अहवालांचा समावेश आहे. आज उपचारादरम्यान एकाचा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरमधून 957 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 189026 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 25537 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 31474 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या  5697 कोरोनाबाधितांवर उपचार  सुरू आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.