पळपूटे देवदूत..!; तुम्‍ही दिलेले बिल नियमात आहे की नाही तपासले तर बिघडले कुठे?; त्‍या राजकीय नेत्‍याचेही सामाजिक भान हरवले!!

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शासकीय यंत्रणेला पडत असलेल्या मर्यादा पाहता अनेक खासगी हॉस्पिटल्सनाही कोरोनाबाधितांवर उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक हॉस्पिटल्सनी ही समाजसेवेची तर काही हॉस्पिटल्सनी लुटीची संधी समजली. मग अव्वाच्या सव्वा बिले देण्याचा सपाटा या हॉस्पिटल्सनी लावून आधीच संकटात सापडलेल्यांची कोंडी केली. …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सध्या कोरोना रुग्‍णसंख्या वाढत आहे. शासकीय यंत्रणेला पडत असलेल्या मर्यादा पाहता अनेक खासगी हॉस्पिटल्सनाही कोरोनाबाधितांवर उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक हॉस्पिटल्सनी ही समाजसेवेची तर काही हॉस्पिटल्‍सनी लुटीची संधी समजली. मग अव्वाच्‍या सव्वा बिले देण्याचा सपाटा या हॉस्पिटल्सनी लावून आधीच संकटात सापडलेल्यांची कोंडी केली. थोडक्‍यात मृतांच्‍या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार… याला कुठेतरी चाप बसणे गरजेचे होते. काही दक्ष लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवला. संवेदनशील पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने मग त्‍या त्‍या हॉस्पिटल्सवर ‘ऑडिटर’ नियुक्‍त केले. आता हे ऑडिटर रोज बिले चेक करणार, नियमात नसले की फटकारणार, नियमात बिले द्यायला सांगणार, मग ती बिले कमी होणार… यामुळे ‘मुख्य उद्देशा’लाच हरताळ फासला जाणार हे लक्षात येताच लुटारू देवदूतांनी पळपूटेपणा केल्याचे दिसून येत आहे. याला साथ लाभली ती एका असंवेदनशील राजकारण्याची. जेव्‍हा आपल्याही कोविड सेंटरवर ऑडिटर नेमला गेला तेव्‍हा या राजकारण्याचा जळफळाट झाल्‍याचे दिसून येत असून, डॉक्‍टरांना पुढे करून पालकमंत्र्यांना आम्‍ही उपचारच बंद करतो, असे धमकीपत्रच देण्यात आले. रुग्‍णसेवेचा वसा घेतलेले डॉक्‍टर अशाप्रकारे धमकी कसे देऊ शकतात, असा प्रश्न तमाम जिल्हावासियांना पडला आहे.

बुलडाणा लाइव्‍हने चिखलीतील एका हॉस्पिटलवर नियुक्‍त करण्यात आलेल्या ऑडिटरांशी संपर्क साधून, तुमच्‍यामुळे डॉक्‍टरांना त्रास कशाप्रकारे होऊ शकतो, असा थेट प्रश्न केला. त्‍यावर त्‍यांनी सांगितले, की त्रास होण्याचा विषयच नाही. आम्‍ही केवळ कर्तव्य बजावतो. हॉस्पिटल्सनी दिलेली बिले नियमात बसतात का, एवढेच तपासतो. जास्तीचे बिल लावले असेल तर ते कमी करायला सांगतो एवढेच. यामुळे रुग्‍णांची लूट थांबल्याचे त्‍यांनीही मान्य केले. मग केवळ ऑडिटर नेमल्याने राजकीय हस्तक्षेप वाढल्‍याचा बाऊ कशाकरिता हेही अनाकलनीय आहे. सध्याचा काळ हा संकटाचा आहे. या काळात आपल्यातील देवदूत जागवून अधिकाधिक सेवा कशी घडेल हे बघणे गरजेचे आहे. केवळ ऑडिटर नेमले म्‍हणून आकाडतांडव करणे आणि थेट कोरोना रुग्‍णांवर उपचारच बंद करण्याची धमकी देणे इतकी असंवेदशीलता डॉक्‍टरांमध्ये येणे हेच आश्चर्य आहे.

भाऊ राजकारण नाही रुग्‍णांकडे बघा…
रुग्‍णांसाठी कळवळा दाखवणाऱ्या भाऊंनी अचानक डॉक्‍टरांची बाजू घेणे, त्‍यांच्‍या प्रत्‍येक कृतीला समर्थन दर्शवल्याने नागरिक हैराण झाले आहेत. भाऊंनीही कोविड सेंटर सुरू केले, त्‍यावरही ऑडिटर नेमलेला आहे. त्‍यामुळे परेशान झालेत का, असाही प्रश्न अनेकांनी केला आहे. ऑडिटर नेमला म्‍हणजे चौकशी लावली असे नाही. तरीही चौकशीच्‍या फेऱ्यात आता डॉक्‍टरांनी अडकायचे का, असा भाबडा सवाल भाऊंनी केल्याने समर्थकही अचंबित झाले आहेत. ताई-भाऊंच्‍या लढाईत रुग्‍णांचे हाल नको, एवढी तरी संवेदनशीलता बागळणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्‍यक्‍त केले आहे.

तक्रारी आहेत म्‍हणून…
हॉस्पिटल्सवर ऑडिटर नेमले गेले, कारण रुग्‍णांच्‍या तक्रारी वाढल्‍या होत्‍या. त्‍या केवळ चिखलीच्‍या लोकप्रतिनिधींकडे नाही तर जिल्हाभरातून पालकमंत्र्यांकडेही झाल्या आहेत. त्‍यातून पालकमंत्री आणि प्रशासनाने ऑडिटर नेमले आहेत. प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या खऱ्याखुऱ्या देवदूतांना हे ऑडिटर जाचक वाटत नसले तरी कोरोनाला संधी समजणाऱ्यांकडून विरोध होणे साहाजिक होते. अशा स्‍थितीत राजकीय मंडळींनी रुग्‍णांसाठी एकत्र येण्याची गरज होती, मात्र इथेही राजकारण आडवे आले, अशी चर्चा होतेय.

राजकारणाला तर प्रशासनही वैतागलंय…

राजकारण्यांच्‍या भांडणात खरंतर सध्या प्रशासनाही वैतागलंय. कोरोनाशी लढताना ऊर्जा खर्च होण्याची गरज असताना राजकारण्यांना आवरण्यातच प्रशासनाचा वेळ खर्ची होतोय. त्‍यामुळे या संकटात तरी राजकारण्यांनी कोरोनाशी लढण्यात आपला वेळ घालवावा, अशीच अपेक्षा सामान्य व्यक्‍त करत आहेत.

त्‍या 90 टक्‍के डॉक्‍टरांच्‍या पाठिशी ः आमदार महाले पाटील

राजकारण करू नका. मी कोरोना ग्रस्तांच्या भल्यासाठी कष्ट करणाऱ्या 90 टक्‍के डॉक्टरांच्या पाठिशी तर उभी आहेच; परंतु तेवढ्याच खंबीरतेने गोरगरीब जनतेची ही काळजी मला घ्यावी लागणार आहे. ज्यांनी ज्यांनी कोरोनाच्या संकट काळात रुग्ण व त्यांच्‍या नातेवाइकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन लूट केली त्यांच्‍यावर कारवाई गरजेची आहे. त्यामुळे ज्या रुग्णांवर उपचार करताना अवाजवी रक्कम मोजावी लागली असेल त्यांनी याबाबत लेखी स्वरुपात तक्रारी कराव्यात. त्यांना नक्कीच न्याय दिला जाईल.

– आमदार श्वेताताई महाले

डॉक्टरांनी सेवा देणे बंद केले तर उपचार करणार कोण ? (भाऊंची एफबीवरील पोस्‍ट)

शहरांपेक्षा चिखलीतील डॉक्टर कमीच फी घेतात, पण कुणी जास्त फी घेत असेल तर त्यांना समजून सांगत, नाही ऐकले तर कारवाई केली पाहीजे. पण त्यासाठी सर्वच डॉक्टरांना वेठीला धरण्याची गरज नाही. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे कोविड हॉस्पीटलची चौकशी लावण्याचा प्रकार झाला आहे. डॉक्टर मंडळींना विनंती आहे की कुणी बेजबाबदारपणे वागले म्हणून आपण जबाबदारीची भावना विसरणे योग्य होणार नाही.

काय म्‍हणतात डॉक्‍टर…
सेवाकार्यात होत असलेला स्‍थानिक राजकीय हस्‍तक्षेप, ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा तुटवडा यामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्‍यामुळे आमची कोविड सेंटर चालविण्याची क्षमता संपली आहे, असे या डॉक्‍टरांनी म्‍हटले आहे.

या स्‍थितीत शपथ आठवणे गरजेचे…
हे परमेश्वरा, माझ्या हाताला कौशल्य दे. मनाला निकोप दृष्टी दे. हृदयाला दया, प्रेम आणि सहानुभूति व त्यागभावना दे… अशी शपथ वैद्यकीय सेवाव्रत स्वीकारण्यापूर्वी प्रत्‍येक डॉक्‍टरांनी घेतलेली आहे. तिचा विसर पडल्‍याचे या घटनेत दिसून येते.