पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाबद्दल थोडे कडक व्हावे; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वमताने कठोर निर्णय घ्यावे; ‘स्वाभिमानी’चे रविकांत तुपकर यांची अपेक्षा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा भयंकर उद्रेक व प्राणघातक धोका लक्षात घेता राज्य पातळीवर उत्तम काम करणाऱ्या पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाबाबत थोडे कडक धोरण अवलंबणे काळाची गरज ठरत आहे. तसेच जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी कोरोना प्रतिबंधासाठी स्वमताने काही कठोर निर्णय घेणे आवश्यक ठरते, असे स्पष्ट प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा भयंकर उद्रेक व प्राणघातक धोका लक्षात घेता राज्य पातळीवर उत्तम काम करणाऱ्या पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाबाबत थोडे कडक धोरण अवलंबणे काळाची गरज ठरत आहे. तसेच जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी कोरोना प्रतिबंधासाठी स्वमताने  काही कठोर निर्णय घेणे आवश्यक ठरते, असे स्पष्ट प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी येथे केले. या महामारीविरुद्धच्या महायुद्धात तहान लागल्यावर विहीर खोदण्याऐवजी पूर्वीच सुसज्ज उपाययोजना करणे अपेक्षित असल्याचे गंभीर मतप्रदर्शन देखील त्यांनी केले.

पत्रकार भवनात आज, 23 एप्रिलला दुपारी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाविषयक अनुषंगिक विषयावर पोटतिडकीने बोलताना सर्व नेत्यांनी राजकीय भूमिका बाजूला सारून कोविडविरुद्धचा  दीर्घकालीन लढा एकजुटीने लढावा, असे  कळकळीचे आवाहन केले. एरवी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे बोलत सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणाऱ्या तुपकरांचा आजच्या पत्रकार परिषदेमधील  मूड सौम्य, संवेदनशील, गंभीर असा असल्याचे दिसून आले. अगदी दोन आमदारांमधील सार्वजनिक राजकीय राडा, पुतळे दहन, शक्तिप्रदर्शन सारख्या विषयावर बोलताना देखील त्यांनी विस्तृत कमेंट करण्याचे टाळत  झाले ते योग्य झाले नाही, असे सांगून विषयाला बगल दिली. त्याऐवजी सर्व नेत्यांनी पक्षभेद विसरून कोरोना विरुद्धच्या लढ्यात हातात हात घालून लढण्याची अपेक्षा व्यक्त केली.  याचबरोबर जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याबद्धलही त्यांनी अपेक्षा बोलून दाखविल्या. एस. रामामूर्ती हे चांगले व्यक्ती, चांगला माणूस आहे, पण त्यांनी स्वमताने जिल्हा वाचविण्यासाठी  काही कठोर निर्णय  घेणे अपेक्षित व आवश्यक ठरते. कोरोना विरुद्धच्या दीर्घ लढ्यासाठी सुसज्ज तयारी करणे काळाची गरज आहे. त्यात प्रशासन कुठेतरी कमी पडतेय ,असा सूर त्यानी व्यक्त केला. महसूल, आरोग्य, स्थानिक प्राधिकरण, पोलीस विभागात ताळमेळच नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्यात उत्तम काम करणाऱ्या पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा प्रशासनाबद्धल काहीसे कडक होणे, कामे करून घेणे अपेक्षित आहे. स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, पतसंस्था यांच्या माध्यमातून अर्थात सीएसआर (सामाजिक दायित्वच्या) च्या माध्यमातून कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे तुपकर यांनी सुचविले.  यावेळी विनायक सरनाईक, मयूर बोर्डे, राणा चंदन, रफिक भाई , सौरभ तुपकर आदी पदाधिकारी हजर होते.

तुपकर म्हणाले…

  • 1 मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींनाही लस देण्याचे नियोजन आहे. यामुळे पुरेशी मागणी नोंदवणे, रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखणे आवश्यक, पत्रकारांना विमा कवच संरक्षण द्यावे.
  • महिला रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांची वागणूक अयोग्य
  • खासगी डॉक्टरांनी कोरोना संकटाचा गैरफायदा घेऊ नये
  • आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास गरिबांना शासकीय रुग्णालयात बेडस मिळतील.
  • शहरात वॉर्ड निहाय लसीकरण कॅम्प घ्यावेत

ग्रामीण नेत्याचा ग्रामीण उपाय

दरम्यान यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी  कोरोना प्रतिबंधासाठी ग्रामीण स्तरावरील आगळावेगळा उपाय सूचविला. गाव पातळीवर कम्युनिटी हेल्थ वर्कर, आशा, अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, यांची ग्राम कृती समिती गठीत करावी. समितीच्या माध्यमाने व पंचायत समिती फंड वा अन्य निधीतून गावातील शाळांत विलगिकरण कक्ष उभारावे, तसेच मोठ्या ग्रामपंचायतिनी कोविड केअर सेंटर उभारावे. यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही, असा विश्वास व्यक्त करून सौम्य रुग्णावर गावातच इलाज होईल, यामुळे गाव परिसरातच उपचार होऊन कोविडचा धोका, फैलाव रोखणे, त्याला नियंत्रणात ठेवणे, गावकऱ्यांची शहरातील उपचाराविषयीची भीती दूर करण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव मांडला असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद व अंमलबजावणी अपेक्षित असल्याचे तुपकर म्हणाले.