पावसाचे पुनरागमन… मेहकरवर कृपादृष्टी कायम, शेगावला अजूनही प्रतीक्षा; रखडलेल्या पेरण्या मार्गी लागणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून गायब झालेल्या पावसाने काल, ११ जुलैला सकाळपासून पुनरागमन केले आहे. जिल्ह्यात सर्वदूर कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पाऊस बरसला. हवामान विभागाकडे जिल्ह्यात सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. यावर्षी पावसाच्या आकडेवारीत सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या मेहकर तालुक्यात काल पुन्हा एकदा जोरदार वर्षाव झाला. मेहकर तालुक्यातील वरवंड मंडळात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून गायब झालेल्या पावसाने काल, ११ जुलैला सकाळपासून पुनरागमन केले आहे. जिल्ह्यात सर्वदूर कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पाऊस बरसला. हवामान विभागाकडे जिल्ह्यात सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. यावर्षी पावसाच्या आकडेवारीत सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या मेहकर तालुक्यात काल पुन्हा एकदा जोरदार वर्षाव झाला. मेहकर तालुक्यातील वरवंड मंडळात जोरदार पावसाने कॅनॉल फुटून दोन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सर्वात कमी पावसाची नोंद असलेला जळगाव जामोद आणि शेगाव तालुका अजूनही तळाशी असून, तिथे अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

गेल्या १० ते १५ दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस गायब होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार तर काही शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. घाटाखालील शेगाव, जळगाव जामोद व घाटावरील बुलडाणा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील पहिल्या पेरण्याही अजूनही रखडलेल्या आहेत. परतलेल्या पावसाने रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी बळीराजा सरसावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मेहकर तालुक्यात सर्वाधिक 395 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वांत कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात (60.8 मि. मी.) नोंदविण्यात आला.

मेहकर तालुक्यात कॅनॉल फुटून शेतकऱ्यांचे नुकसान
मेहकर तालुक्यातील वरवंड मंडळात काल जोरदार पावसाने हजेरी लावली. बोथा शिवारातील छोटा कॅनॉल फुटल्याने दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दिलीप पायघन आणि विठ्ठल बोराडे यांच्या शेतात कॅनॉल फुटून पाणी घुसल्याने कांदा आणि हळद पिकाचे मोठे नुकसान झाले.

शेगाव तालुक्यात पाऊस नाही मात्र नदीला आला पूर…
शेगाव तालुक्यात आतापर्यंत केवळ 66 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, पेरण्याही रखडल्या आहेत. मात्र तरीही खिरोडा (ता. शेगाव) येथून वाहणारी पूर्णा नदी मात्र दुथडी भरून वाहत आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने अकोला जिल्ह्यातून वाहत येणारी पूर्णा दुथडी भरून वाहत आहे.

जिल्ह्यात असा झाला पाऊस (कंसात आतापर्यंत झालेला एकूण पाऊस)

  • मेहकर : 40.7 मि. मी. (395 मि.मी.)
  • मलकापूर: 33.8 मि. मी.(125.2 मि. मी.)
  • संग्रामपूर : 33.5 (172 मि. मी.)
  • खामगाव : 33(252 मि. मी.)
  • नांदुरा : 22.6 (139 मि.मी.)
  • चिखली: 16.7(302.2 मि. मी.)
  • सिंदखेड राजा : 14 (329 मि. मी.)
  • बुलडाणा : 13.9 (175.3 मि.मी.)
  • मोताळा : 12.3 (162 मि.मी.)
  • लोणार ः 10.4 (272.4 मि.मी.)
  • देऊळगाव राजा ः 8.1 (219.3 मि.मी.)
  • जळगाव जामोद ः 7.9 (60 मि. मी.)
  • शेगाव : निरंक(66 मि. मी.)
  • जिल्ह्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरी 205.7 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.