Update : पैनगंगेला पूर; शेगाव तालुक्‍यात नाल्याच्‍या पुरात युवक गेला वाहून; मासरूळमध्ये वीज पडून गाय ठार, येळगाव धरणात ६० टक्‍के जलसाठा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रात्रीपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने “दिलासा आणि धोका’ दोन्हींचा अनुभव जिल्हावासियांना दिला आहे. पावसाळा सरत आला तरी जिल्ह्यात पाऊस तसा कमीच होता. त्यामुळे धरणे, छोट्यामोठ्या प्रकल्पांतही जलसाठा तसा कमीच होता. या पावसामुळे हे प्रकल्प भरण्यास मदत होणार आहे. हा दिलासा असला तरी काढणीला आलेल्या पिकांचे मात्र या पावसामुळे नुकसान होणार …
 
Update : पैनगंगेला पूर; शेगाव तालुक्‍यात नाल्याच्‍या पुरात युवक गेला वाहून; मासरूळमध्ये वीज पडून गाय ठार, येळगाव धरणात ६० टक्‍के जलसाठा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रात्रीपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने “दिलासा आणि धोका’ दोन्‍हींचा अनुभव जिल्हावासियांना दिला आहे. पावसाळा सरत आला तरी जिल्ह्यात पाऊस तसा कमीच होता. त्‍यामुळे धरणे, छोट्यामोठ्या प्रकल्‍पांतही जलसाठा तसा कमीच होता. या पावसामुळे हे प्रकल्प भरण्यास मदत होणार आहे. हा दिलासा असला तरी काढणीला आलेल्या पिकांचे मात्र या पावसामुळे नुकसान होणार आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काठावरील शेतात पाणी शिरले. त्‍यामुळे शेतकरी चिंताग्रस्‍त झाले आहेत. शेगाव तालुक्‍यातील जवळा पळसखेड येथे शेतनाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेला १८ वर्षीय युवक वाहून गेला आहे. बुलडाणा तालुक्‍यातील मासरूळ शिवारात वीज पडून पांडुरंग तोताराम सावळे यांची गाय दगावली.

या बातमीच्या पुढील अपडेट न्‍यूज वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://bit.ly/3h5IicD

घाटाखालील विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते यांनी माहिती दिली, की ६ सप्टेंबरच्‍या सायंकाळपासून वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाने जोर पकडला होता. शेगाव तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. बाळापूर रोडवरील जवळा पळसखेड गावात राहणारा आदित्य संतोष गवई हा तरुण मित्रांसोबत गावातून वाहत असलेल्या शेत नाल्यावर पूर आल्याने पहायला गेला होता. नाल्यात पडून तो वाहून गेला. त्‍याचा शोध घेतला जात आहे. मात्र तो मिळून आलेला नाही. घटनेची माहिती शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला कळविण्यात आली असून, घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल अरुण मेटांगे पोलीस नायक कॉन्स्टेबल प्रवीण ईतवारे दाखल झालेले आहेत. ही घटना आज, ७ सप्‍टेंबरच्‍या सकाळी नऊच्या सुमारास घडली.

बुलडाणा मंडळात ६३ मि.मी. पाऊस; पैनगंगेला पुन्हा पूर, येळगाव धरणात ६० टक्के जलसाठा
पोळा आणि तान्हा पोळाच्या मुहूर्तावर बुलडाणा तालुक्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे पैनगंगा नदीला चालू आठवड्यात दुसऱ्यांदा पूर गेला. यामुळे येळगाव धरणात सुमारे ६० टक्के जलसाठा झाल्याचे सुखद वृत्त आहे. पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याचे सुखद चित्र आज हजारो बुलडाणेकर व परिसरातील ग्रामस्थांनी डोळ्यांनी पाहिले व आपल्या मनासह मोबाईलमध्ये साठविले! सागवान नजीकच्या पुलाखालून वेगाने उसळी घेत वाहणारे पैनगंगेचे पाणी सर्वांना सुखावणारे ठरले. बुलडाणा तालुक्यातील पाडळी महसूल मंडळात ३३, देऊळघाट मंडळात ४०, धाड ३५, म्हसला बुद्रूक २१, साखळी २१ व रायपूर मंडळात २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा शहर व परिसराचा समावेश असलेल्या बुलडाणा महसूल मंडळात सर्वाधिक म्हणजे तब्बल ६३ मिलिमीटर पावसाने हजेरी लावली. यामुळे बुलडाणा शहरासह परिसरातील दहाएक खेड्यांची तहान भागविणाऱ्या येळगाव धरणात दुपारपर्यंत ६० टक्के जलसाठा होण्याची शक्यता पालिका मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी वर्तविली. बुलडाणा शहरात रात्री अधूनमधून पाऊस सुरू होता. सकाळी सातला त्‍याने जोर पकडला तो साडेनऊपर्यंत मुसळधार कोसळत राहिला. शहराला तीन-साडेतीन त्‍याने अक्षरशः धुवून टाकले. त्‍यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. अनेकांच्‍या घरात पाणी शिरल्याने त्‍यांना मोटर लावून पाणी उपसावे लागले. सागवानजवळून वाहणाऱ्या पैनगंगेला पूर आल्याचे पांग्रीचे प्रतिनिधी नितीन सोनटक्‍के यांनी सांगितले.

आज, उद्याही मुसळधार
आज, ७ सप्टेंबर आणि उद्या ८ सप्टेंबर रोजीही जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ६ ते ९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत काल रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्री झालेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. खडकपूर्णा प्रकल्पक्षेत्रात रात्रीसुद्धा मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणाचे आणखी दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे. घाटाखालील खामगाव तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला असून, पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. चिखली तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी- नाल्यांना पूर आला आहे. अंचरवाडी येथील नदीला पूर आल्याने वाहतूक बंद आहे. देऊळगावराजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार या तालुक्यांत रात्री सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.

नागरिकांनो काळजी घ्या…
जिल्ह्यात ७, ८ सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने व हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. पाण्यात वाहन टाकण्याचे धाडस करू नये. घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरात पाणी जाण्याची शक्यता नसल्यास घरातच सुरक्षित थांबावे. आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. घरात पाणी घुसत असल्यास व पाण्याची पातळी वाढत असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. घर मोडकळीस आलेल्या अवस्थेत असेल तर घरात न थांबता घरातील साहित्य घेऊन सुरक्षित ठिकाणी थांबावे. पशुधन व पाळीव प्राण्यांना नदीच्या काठापासून दूर अंतरावर ठेवावे. मासेमारीसाठी व पोहायला नदी, तलाव, नाल्यात जाऊ नये. विजा चमकत असल्यास झाडाखाली थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

खामगाव तालुक्यात अतिवृष्टी
खामगाव तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला. आज सकाळपर्यंत १०६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. खामगाव शहरातील सुटाळपुरा भागातील रस्त्यातून पाणी वाहत आहे. शहरातील फरशी नाल्यावरून सुद्धा पाणी वाहत असल्याचे नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. वृत्त लिहीपर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.