जिल्हाभर पावसाने दाणादाण!; बुलडाणा, मोताळा तालुक्‍यात दैना, चिखलीत हाहाकार!; 8 तास वीजपुरवठा खंडित

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सलग तासभर धो धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने काल, 29 मे रोजी सायंकाळी जिल्हावासियांची दाणादाण उडवली. विशेषतः बुलडाणा, मोताळा, चिखली तालुक्यात पावसासह वीज, वादळवाऱ्यांनी मोठे नुकसान केले आहे. अनेकांच्या घरावरील छपरे उडून गेली. झाडे उन्मळून पडली, विद्युत खांब कोसळून तारा तुटल्या, अनेकांच्या घरांतही पाणी शिरले. चिखलीतील वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सलग तासभर धो धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने काल, 29 मे रोजी सायंकाळी जिल्हावासियांची दाणादाण उडवली. विशेषतः बुलडाणा, मोताळा, चिखली तालुक्‍यात पावसासह वीज, वादळवाऱ्यांनी मोठे नुकसान केले आहे. अनेकांच्‍या घरावरील छपरे उडून गेली. झाडे उन्‍मळून पडली, विद्युत खांब कोसळून तारा तुटल्‍या, अनेकांच्‍या घरांतही पाणी शिरले. चिखलीतील वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 कि.मी.पेक्षा अधिक असल्याचे जाणकारांनी सांगितले. चिखलीतील वीजपुरवठा सायंकाळी साडेचार-पाचपासून खंडित होता, तो मध्यरात्री सुरू झाला, तर काही भागांत पहाटे वीज आल्याचे रहिवाशांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. जिल्ह्याच्या अन्य भागातही पावसाने हजेरी लावत फळपिकांचे नुकसान केल्याची माहिती आज सकाळी हाती आली.

चिखलीत कहर
चिखली- बुलडाणा मार्गावर अनेक ठिकाणी दुतर्फा असलेले वृक्ष कोसळल्‍याने वाहतूक ठप्प झाली होती. दिवठाणा (ता.चिखली) येथे वीज पडून म्‍हैस व वगार ठार झाली. चिखली शहरातील माळीपुरा येथील भराड मळा येथे १५० वर्षे जुने पिंपळाचे झाड पडून घरे, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांचे व हनुमान मंदिराचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच अवचार मळा , संभाजीनगर, पुंडलिकनगर व ग्रामीण भागातील विद्युत खांब पडल्याच्या, झाडे उन्मळून पडल्याच्या, अनेक नागरिकांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या व घरात पाणी घुसून घरातील अन्नधान्याची नासाडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कॉटन मार्केटमध्ये पाणी शिरले. टिनपत्रेही उडाली. या सर्व घटनांची माहिती प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार, मुख्याधिकारी व महावितरणचे अधिकारी यांना सोबत घेऊन आमदार श्वेताताई महाले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान झालेल्या नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी, पडलेले इलेक्ट्रिक पोल्स लवकरात लवकर पुन्हा उभे करण्यात यावेत तसेच ज्यांच्या घरात पाणी घुसून अन्न धान्याची नासाडी झाली त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशा सूचना संबंधितांना आमदार महाले पाटील यांनी केल्या. यावेळी तलाठी योगेश भुसारी, तलाठी श्री. गिरी, महावितरणचे श्री. भुसारी ,नगरपालिकेचे अर्जुन इंगळे, दिलीप इंगळे, नगरसेवक सुदर्शन खरात, विजय वाळेकर, परवेज जमादार, विलास घोलप, सचिन कुलवंत आदी उपस्थित होते. पाऊस बंद होताच वीज खंडित झाली. याबद्दल रात्रीच जेव्हा महावितरणचे सहाय्यक अभियंता ए. बी. भुसारी यांच्‍याशी बुलडाणा लाइव्हने संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितले की, ठिकठिकाणी झाडे विजेच्‍या तारांवर कोसळून अनेक ठिकाणी तारा तुटल्‍या. विद्युत खांबही पडले. सध्या युद्धपातळीवर दुरुस्‍ती मोहीम राबवत आहोत. सर्व अधिकारी- कर्मचारी फिल्डवर असल्याने मोबाइल चार्ज सुद्धा करणे कठीण आहे. यावेळी लोकांनी संयम व शांतता बाळगावी, असे आवाहन त्‍यांनी केले होते. चिखलीसह देऊळगाव राजा येथील कर्मचारीसुद्धा चिखलीत येऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत होते. त्‍यामुळे मध्यरात्री वीज आली, तर काही भागांत आज पहाटे.

बुलडाणा, मोताळ्यातही नुकसान
मोताळा आणि बुलडाण्यातही जोरदार हजेरी लावत पावसाने मोठे नुकसान घडवले. मोताळा तहसील कार्यालयाचे छत उडाले. उर्दू शाळेवरील टिनपत्रेही उडाली. डाभा, राहेरा, गुळभेली, खामखेड, मोहेगाव, खैरखेड या गावांमध्ये घरांची पडझड झाली. शेतकऱ्यांचे घरातील खते, बियाणे, धान्य भिजून नुकसान झाले. बुलडाणा तालुक्‍यातील दहिद बुद्रूक येथे अनेकांच्‍या घरांवरील टिनपत्रे उडून गेली. दोन्‍ही तालुक्‍यात महावितरणचे मोठे नुकसान झाले.

पहूरजिऱ्यात 150 घरांवरील पत्रे उडाली

खामगाव तालुक्‍यातील पहूरजिरा येथे 28 मे रोजी झालेल्या पावसाने 150 हून अधिक घरांची पत्रे उडून गेली. त्‍यामुळे ग्रामस्‍थांना रात्र उघड्यावर काढावी लागली. विद्युत खांब कोसळल्‍याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

महावितरणची मान्‍सूनपूर्व तयारी नावालाच?

पावसाळ्याच्‍या तोंडावर दरवर्षी महावितरण कंपनीकडून मान्‍सूनपूर्व कामे करण्यात येतात. पण ही कामे बहुतांश भागांत केवळ कागदावरच होत असतात. पहिल्याच मोठ्या पावसाने महावितरणची ही तयारी उघडी पाडली.