पिकांच्‍या पानांवर अचानक पांढरे ठिपके!; जळगाव जामोद तालुक्‍यातील शेतकरी चक्रावले!,अधिकारी म्‍हणतात, तूर्त रहस्य सांगता येणार नाही!

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरातील शेतकरी काल, २२ जुलैला अचानक चक्रावून गेले. शेतातील कपाशी, सोयाबीन पिकावर अचानक पांढरे ठिपके पडल्याने शेतकरी भयभीत झाले अाहेत. ही माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे यांनी शेतांची पाहणी केली. पिकांच्या पानांचे नमुने तपासणीसाठी कृषी विज्ञान केंद्राकडे पाठविण्यात आले आहेत. २१ जुलैच्या मध्यरात्री …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरातील शेतकरी काल, २२ जुलैला अचानक चक्रावून गेले. शेतातील कपाशी, सोयाबीन पिकावर अचानक पांढरे ठिपके पडल्याने शेतकरी भयभीत झाले अाहेत. ही माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे यांनी शेतांची पाहणी केली. पिकांच्या पानांचे नमुने तपासणीसाठी कृषी विज्ञान केंद्राकडे पाठविण्यात आले आहेत.

२१ जुलैच्‍या मध्यरात्री जळगाव जामोद तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र २२ जुलै रोजी सकाळी सुनगावसह जळगाव जामोद तालुक्यात कपाशी, सोयाबीन व इतर पिकावर पांढऱ्या रंगाचे ठिपके पिकावर आढळले. त्यामुळे शेतकरी घाबरून गेले. जळगाव जामोद तालुक्यात यंदा पावसाने दांडी मारली होती. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद जळगाव जामोद तालुक्यात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर सात ते आठ दिवसांनंतर झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली असली या झालेल्या पावसामुळे परिसरातील पिकांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके आढळल्‍याने हा कोणता नवीन रोग आता म्‍हणून त्‍यांच्‍या तोंडचे पाणी पळाले. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी परिसरातील पिकांची पाहणी केली.

पानांचे नमुने कृषी विज्ञान केंद्राकडे तपासणीसाठी पाठविले. परिसरातील ठिपके हे पावसामुळेच पडले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी काही भागात असे प्रकार घडले आहेत. पावसामुळे पाने धुतली गेल्यामुळे व पानावरील पूर्ण क्षार एकत्रित आल्यामुळे असे ठिपके पडू शकतात. तरीही कृषी विज्ञान केंद्राकडून याबद्दलची माहिती येईपर्यंत या ठिपक्यांचे नेमके रहस्य सांगता येणार नसल्याचे जळगाव जामोदचे तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलतांना सांगितले. या ठिपक्यांमुळे पिकांवर कुठलाही अपाय झाला नसल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचेही ते म्हणाले.