‘पॉझिटिव्ह’ बातमी! कर्मचारी परतले; बुलडाणा तहसील कार्यालय गजबजले!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तहसील कार्यालयातील ‘त्या ‘ 21 पैकी 19 कर्मचारी कामावर परतल्याने कामकाज पूर्ववत सुरळीत झाले असून, आता कार्यालय परिसर नेहमीप्रमाणे गजबजलेला दिसून येत आहे. यापूर्वी मार्चचा पहिला आठवडा तहसीलचे कामकाज ठप्प करणारा व तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यासह कर्मचाऱ्यांची कठोर परीक्षा घेणारा ठरला! 4 मार्चला तहसीलमधील 3 तर …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तहसील कार्यालयातील ‘त्या ‘  21 पैकी 19 कर्मचारी कामावर परतल्याने कामकाज पूर्ववत सुरळीत झाले असून, आता कार्यालय परिसर नेहमीप्रमाणे गजबजलेला दिसून येत आहे.

यापूर्वी मार्चचा पहिला आठवडा तहसीलचे कामकाज ठप्प करणारा व तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यासह कर्मचाऱ्यांची कठोर परीक्षा घेणारा ठरला! 4 मार्चला तहसीलमधील 3 तर 7 मार्चला तब्बल 15 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले. या पाठोपाठ 8 मार्चला आणखी 1 जण बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. याशिवाय एका कर्मचाऱ्यात कोरोनाची  गंभीर लक्षणे आढळली. नंतर त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची संख्या 21 वर गेली. परिणामी किमान पंधरवडाभर  दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले. तहसीलदार रुपेश खंडारे यांनी जेमतेम 9 कर्मचाऱ्यांच्या मदतीने पंधराएक दिवस ग्रामपंचायत निवडणुकीनंतरची व मार्च एन्डची कामे पार पाडलीत. दरम्यान उपचारानंतर यापैकी निगेटिव्ह अहवाल आलेल्यांपैकी 19 कर्मचारी  अलीकडेच कामावर रुजू झाले. यामुळे तहसीलचा गाडा व दैनंदिन कामकाज पूर्व पदावर आले आहे.