प. पू. शुकदास महाराजांच्या समाधी स्मारक मंदिराचे बांधकाम प्रगतिपथावर; ‘भाविकांनी सढळ हाताने मदत करावी’

हिवरा आश्रम, ता. मेहकर (विशेष प्रतिनिधी) ः बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध विवेकानंद आश्रम या संस्थेचे संस्थापक, निष्काम कर्मयोगी संत प. पू.शुकदास महाराज 2017 च्या श्रीराम नवमीला ब्रह्मलीन झाले. सेवा परमो धर्म जगणारा एक साधू समाधिस्त झाला. त्यांनी निर्माण केलेला सेवेचा वटवृक्ष मात्र चिरंतन बहरत आहे. त्यांचे समाधीस्थळ लाखो भाविकांसाठी श्रध्दास्थळ आहे. समाधी स्मारक मंदिराचे बांधकाम सध्या …
 

हिवरा आश्रम, ता. मेहकर (विशेष प्रतिनिधी) ः बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध विवेकानंद आश्रम या संस्‍थेचे संस्‍थापक, निष्काम कर्मयोगी संत प. पू.शुकदास महाराज 2017 च्या श्रीराम नवमीला ब्रह्मलीन झाले. सेवा परमो धर्म जगणारा एक साधू समाधिस्त झाला. त्यांनी निर्माण केलेला सेवेचा वटवृक्ष मात्र चिरंतन बहरत आहे. त्यांचे समाधीस्थळ लाखो भाविकांसाठी श्रध्दास्थळ आहे. समाधी स्‍मारक मंदिराचे बांधकाम सध्या प्रगतिपथावर असून, भाविकांच्या सहभागातून निर्माण होणारे हे स्मारक मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुना सुध्दा ठरणार आहे.

8 नोव्हेंबर 2018 ला दिवाळी पाडव्याच्‍या शुभमुहूर्तावर स्वामी हरिचैतन्यानंद महाराज (गुरूदेव आश्रम पळसखेड) यांच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. जमिनीखाली 15 फूट खोलपर्यंत दगडीबांधकाम पूर्ण करून 12 जुलै 2019 रोजी आषाढी एकादशीला मुख्य बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. आंबाजी नावाने प्रसिध्द असलेल्या उत्तम दर्जाच्या पांढऱ्या शुभ्र मार्बलमध्ये हे बांधकाम सुरू आहे. मार्बलवरील नक्षीकाम अत्यंत सुबक असून, विविध देवदेवतांच्या प्रतिमा त्यात साकारल्या जाणार आहेत. राजस्थान येथील मिनाक्षी मार्बल या सुप्रसिध्द टेंपल डिझायनिंगचे मालक मिठनलाल मालविया बांधकाम करीत आहेत. जमिनीपासून 55 फूट उंच असणाऱ्या या मंदिरासमोर भव्य सभा मंडप राहणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात परंपरांचा कुबट वास राहणार नाही, असे आश्रम सूत्रांनी सांगितले. मोजक्या कुशल कारागीरांच्या मदतीने बांधकाम सुरू आहे. भाविकांनी सढळ हाताने या निर्माणाधीन कार्यास मदत करावी, असे आवाहन विवेकानंद आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

मदतीसाठी आश्रमाचा बँक खाते क्रमांक ः

President, Vivekanand Ashram , Hiwara Ashram

SBI A/C NO : 11390333339

IFSC CODE : SBIN0018641

(कृपया देणगी देण्याआधी खाते क्रमांकाची अध्यक्षांना 9767897308 या नंबरला दूरध्वनी करून विचारणा करून घ्यावी.)