फोन पेला बक्षीस लागल्याचे सांगून इंजिनिअरिंगच्‍या विद्यार्थिनीला 80 हजारांनी गंडवले!; शेगावमधील प्रकार

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हॅलो नमस्कार मी राहुलकुमार बोलतोय फोन पे कंपनीतून… तुम्ही फोन पेचा वापर खूप छान केलात म्हणून तुम्हाला आमच्याकडून 5 हजार रुपयांचे बक्षीस लागले आहे… ते बक्षीस हवे असेल तर…. अशी ही फसवणुकीची सुरुवात झाली अन् त्यात इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी अडकत केली… 5 हजारांचे बक्षीस तर मिळालेच नाही पण तिच्या खात्यातून भामट्याने …
 
फोन पेला बक्षीस लागल्याचे सांगून इंजिनिअरिंगच्‍या विद्यार्थिनीला 80 हजारांनी गंडवले!; शेगावमधील प्रकार

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हॅलो नमस्‍कार मी राहुलकुमार बोलतोय फोन पे कंपनीतून… तुम्‍ही फोन पेचा वापर खूप छान केलात म्‍हणून तुम्‍हाला आमच्‍याकडून 5 हजार रुपयांचे बक्षीस लागले आहे… ते बक्षीस हवे असेल तर…. अशी ही फसवणुकीची सुरुवात झाली अन्‌ त्‍यात इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी अडकत केली… 5 हजारांचे बक्षीस तर मिळालेच नाही पण तिच्‍या खात्‍यातून भामट्याने 80 हजार रुपये गायब केले. या विद्यार्थिनीने शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

धनश्री गोठीराम शेगोकार (20, रा. मिलिंदनगर नागझरी रोड तीन पुतळ्याजवळ, शेगाव) ही गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकते. तिचे वडील ठेकेदारीचे काम करतात. त्यांना पैशांची देवाणघेवाण करावी लागते. त्यामुळे वडिलांनी तिला फोन पेव्दारे देवाणघेवाण करण्यास सांगितले होते. त्यामुळे तिने मोबाइलमध्ये फोन पे अॅप डाउनलोड केले होते. 27 जूनला दुपारी 4 वाजता ती घरी असताना मोबाइलवर तिला 8389026654 या नंबरवरून फोन आला. समोरील व्‍यक्‍तीने सांगितले, की राहुलकुमार फोन पे कंपनीकडून बोलत आहे. तुम्ही फोन पेचे कस्टमर असून, मागील एक वर्षापासून तुम्ही फोन पेचा खूप चांगला वापर केला असल्याने तुम्हाला कंपनीने 5000 रुपये रिवार्ड (बक्षीस) दिलेला आहे. त्यासाठी तुमच्‍या मोबाइलमध्ये एनीडेस्‍क नावाचे अॅप डाउनलोड करा. त्‍यामुळे धनश्रीने मोबाइलमध्ये एनीडेस्‍क ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर राहुल कुमार नावाच्‍या या भामट्याने तिला 5000 रुपयांच्‍या बक्षिसासाठी फोन पेवर 5000 रुपयांची ऑनलाइन रिक्वेस्ट पाठविली. त्या रिक्वेस्टवर हरीटेक सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड असे लिहलेले होते.

तिने रिक्वेस्ट मान्य करून 5000 रुपये पाठविले. मात्र तरीही पाच हजार रुपये आले नाही. तिने त्‍याला तसे सांगितले असता त्‍याने पुन्‍हा सांगितले की, तुमचे 5000 रुपये रिफंड करण्यासाठी पुन्हा 5000 रुपये पाठवावे लागतील असे म्‍हणून त्‍याने पुन्‍हा 5000 रुपयांची ऑनलाइन रिक्वेस्ट पाठविली. तिने पुन्हा 5000 रुपये ती रिक्‍वेस्ट मान्य करून पाठवले. मात्र तरीही पाठविलेले पैसे आले नसल्याचे तिने त्‍याला सांगितले. त्‍यावर त्याने सांगितले की, तुम्हाला जर तुमचे पैसे पाहिजे असतील तर रिक्वेस्टनुसार पैसे पाठवावे लागतील, असे कॉम्पुटर सांगत आहे. तुमचे पैसे आले नाहीतर तुम्ही फोन कट करून पोलीस तक्रार करू शकता. त्याने पुन्हा 10,000 रुपयांची रिक्वेस्ट पाठविली. तिने रिक्वेस्टनुसार आणखी 10,000 रुपये पाठविले. पैसे परत येत नसल्याने त्याने फोन पेवर पाठविलेल्या रिक्वेस्टला प्रत्येक वेळेस 10,000 रुपये असे एकून 80,000 रुपये तिने पाठविले. पैसे रिफंड होतील या उद्देशाने तिने तत्‍काळ रिपोर्ट दिला नाही. मात्र फसवणूक झाल्याची खात्री पटल्‍याने तिने शेगाव शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध तक्रार दिली आहे.

शेतकरी, नागरिकांना आवाहन…
सध्याच्‍या काळात ऑनलाइन फसवणुकीच्‍या तक्रारी वाढल्या आहेत. फोन पे, गुगल पे, बँकेतून बोलतो असे सांगून तुम्‍हाला बक्षीस लागले, तुमचे एटीएम बंद पडले, तुमचे फोन पे-गुगल पे बंद पडले असे हे भामटे सांगतात आणि बोलण्यात गुंतवून फसवतात. त्‍यामुळे कुणीही अशा प्रकारे फोन आल्यास त्‍यांच्‍या बोलण्यात अडकू नये. त्‍यांनी सांगितलेले कोणतेही ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करू नये. कारण त्‍यांनी सांगितलेले ॲप तुम्‍ही डाऊनलोड केले की तुमचा मोबाइल तो नियंत्रित करू शकतो. त्‍यामुळे तुमची आर्थिक लूट होऊ शकते. आपली कोणतीही वैयक्‍तीक माहिती जसे की जन्‍मतारिख, संपूर्ण नाव, एटीएमचा सीव्‍हीव्‍ही (जो कार्डमागे तीन आकडी असतो.), फोनवर आलेला ओटीपी, कौटुंबिक माहिती कुणालाही देऊ नये. अगदी बँकेतून कॉल आला तरीही माहिती देऊ नये. खात्रीसाठी हवे तर बँकेत जाऊन विचारणा करावी. पण फोनवर कोणतीही माहिती देऊ नये. तुम्‍ही त्‍यांच्‍या जाळ्यात अडकलात तर तुमचे बँक खाते रिकामे झाल्यावाचून राहणार नाही आणि एकदा गेलेले पैसे परत मिळतीलच याची काही शाश्वती नाही. कारण हे भामटे सतत नंबर आणि त्‍यांचा पत्ता बदलत असतात. त्‍यामुळे पोलीस तपासातही मोठ्या अडचणी येत असतात.