बँड बाजा अन्‌ थकबाकीदारांसमोर वरात!; लोणारमध्ये एकाच दिवशी वसूल झाले 650000/-

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोर अचानक बँडबाजा वाजू लागल्याने चकीत झालेल्या रहिवाशांनी बाहेर येऊन पाहिले तर चक्क नगरपालिकेचे करवसुली पथक. मालमत्ता व पाणी करासाठी आलेल्या पथकाने त्यांना कर भरण्यास सूचित केले. यातून काही ठिकाणी वादविवादही बघायला मिळाले. या उप्परही दिवसभर तब्बल 6 लाख 50 हजार रुपयांची गंगाजळी पालिकेच्या तिजोरीत जमा झाली …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरासमोर अचानक बँडबाजा वाजू लागल्याने चकीत झालेल्या रहिवाशांनी बाहेर येऊन पाहिले तर चक्‍क नगरपालिकेचे करवसुली पथक. मालमत्ता व पाणी करासाठी आलेल्या पथकाने त्‍यांना कर भरण्यास सूचित केले. यातून काही ठिकाणी वादविवादही बघायला मिळाले. या उप्परही दिवसभर तब्‍बल 6 लाख 50 हजार रुपयांची गंगाजळी पालिकेच्‍या तिजोरीत जमा झाली आहे, हे विशेष.

लोणार शहर सतत कोणत्‍या ना कोणत्‍या वेगळ्या उपक्रमामुळे किंवा कारणाने चर्चेत असते. नळाचे पाणी महिन्याने येत असल्याने नागरिकाही कर भरण्यास टाळाटाळ करतात. यामुळे नगरपालिकेचा नागरिकांकडे मोठा कर थकला आहे. आज, 25 मार्चला नवीनच फंडा करवसुलीसाठी नगरपालिकेने राबवला. मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी करवसुलीसाठी दोन पथके नियुक्त केली. ही पथके सकाळी आठ ते बारा व चार ते सात या  काळात थकबाकीदारांच्‍या घराजवळ गेली तीच मुळात बँडबाजा घेऊन. माइकद्वारे थकीम रक्कम सांगून तसेच घराजवळ बँड वाजवून रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले. अचानक आपल्या दारी बँड कसा काय वाजतोय, यामुळे घरातील व्‍यक्‍तीही चकीत झाल्या होत्‍या. काही दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाकडून थकबाकीदारांच्‍या नावांचे पोस्टर चौकाचौकात झळकले आहे. आज रोजी या उपक्रमाचा दुसरा अंक पहायला मिळाला. साडेसहा लाख रुपये दिवसभरात वसूल झाल्यानंतर उद्या 26 मार्चला सकाळी दहापर्यंत थकबाकी धारकांनी थकित रक्कम जमा न केल्यास  जप्तीचा आदेश देण्यात येईल, असा इशाराच नगरपालिका प्रशासनाने दिला आहे.