बकरी ईद साध्या पध्दतीने घरीच साजरी करा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही धोका अद्यापही कायम आहे. त्यादृष्टीने सर्वांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्यामुळे यावर्षीही २१ जुलैला बकरी ईद अत्यंत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही धोका अद्यापही कायम आहे. त्यादृष्टीने सर्वांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्यामुळे यावर्षीही २१ जुलैला बकरी ईद अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करणे आवश्यक आहे. त्यानुसार शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मशिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच साजरी करावी. सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाइन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. लागू करण्यात आलेले नियम आणि त्यानंतर वेळोवेळी निगर्मित केलेल्या सुचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यात बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, असेही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.