बनावट उंट बिडीच्‍या रॅकेटचा अखेर पर्दाफाश!; मलकापूरचे कनेक्‍शन गोंदिया व्‍हाया बऱ्हाणपूर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : उंट बिडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीची विक्री करणाऱ्या मलकापुरातील व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. आज, 3 एप्रिलला या कारवाईतील इतर आरोपींसह मुख्य आरोपीस मलकापूर शहर पोलिसांनी गोंदिया येथून अंदाजे दीड लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट बिड्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : उंट बिडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीची विक्री करणाऱ्या मलकापुरातील व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली  होती. आज, 3 एप्रिलला या कारवाईतील इतर आरोपींसह मुख्य आरोपीस मलकापूर शहर पोलिसांनी गोंदिया येथून अंदाजे दीड लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट बिड्या विक्रीसाठी येत होत्‍या. त्यामुळे उंट बिडी कंपनीला आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार कंपनीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्‍यावरून 12 मार्च रोजी मलकापूर शहरातील रामचंद्र ट्रेडर्सवर छापा मारून दुकानातून उंट बिडीच्या नावाचा बनावट बिड्यांचा साठा जप्त केला होता. यावेळी आरोपी अमर रामचंद्र तलरेजा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्‍याला अटक करण्यात आली होती. त्‍याच्‍या 3 दिवसांच्‍या पोलीस कोठडीत त्‍याने बरीच माहिती पोलिसांना दिली. त्‍यानुसार बऱ्हाणपूर येथील दिनेश हुंदराज शतवानी याने मलकापूरच्‍या रामचंद्र ट्रेडर्सला बनावट बिडी विक्री केल्याचे समोर आले. मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या दबंग महिला एपीआय स्मिता म्हसाये व त्यांची टीम तात्काळ बऱ्हाणपूरला रवाना झाली. दिनेश हुंदराज शतवानी याला ताब्यात घेत मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आणले. त्‍याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यालासुद्धा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता बऱ्हाणपूर येथीलच भजनलाल जयरामदास भोजवानी हा देखील आरोपींना बनावट बिडी विक्री करत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी बुऱ्हाणपूर येथून भजनलाल जयरामदास भोजवानी व मिनी फॅक्टरी चालवणाऱ्या रोशन खान हुसेन खान याला सुद्धा अटक केली. त्यांनादेखील पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. त्यांनी दिलेल्या कबुलीवरून गोंदिया येथील मुख्य आरोपी इम्रान युनूस पोथीयावाला हा गोंदिया येथे मोठ्या प्रमाणात बनावट उंट बिडी तयार करत होता. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून मुद्देमालासह त्‍याला अटक करण्यात आली. कारवाईत एक लाख 27 हजार 89 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी, ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये, पो.काँ. मंगेश चरखे , पो.काँ. प्रमोद राठोड यांच्‍या पथकाने  केली. एका आठवड्याच्या आत नकली उंट बिडी बनविणाऱ्या आरोपींची साखळी तोडून १५ दिवसांत संपूर्ण तपास यशस्वीपणे पूर्ण केल्याने मलकापूर शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.