बर्ड फ्लू : भानखेडपासून 10 किमी परिसर निगराणी क्षेत्र घोषित

बाधित क्षेत्रातील कोंबड्या, अंडी व खाद्याची तात्काळ विल्हेवाट लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशबुलडाणा ( संजय मोहिते) : जिल्ह्यात बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्यामुळे केवळ पशुसंवर्धन विभागच नव्हे जिल्हा प्रशासनदेखील हाय अलर्ट मोड वर गेलंय! आज प्रजासत्ताक दिनाच्या धामधुमीत जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी तातडीने इन्फेक्टेड झोन व निगराणी क्षेत्र घोषित करून संबंधित पोल्ट्रीसह बाधित क्षेत्रातील पक्षी, अंडी व खाद्याची …
 

बाधित क्षेत्रातील कोंबड्या, अंडी व खाद्याची तात्काळ विल्हेवाट लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बुलडाणा ( संजय मोहिते)
: जिल्ह्यात बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्यामुळे केवळ पशुसंवर्धन विभागच नव्हे जिल्हा प्रशासनदेखील हाय अलर्ट मोड वर गेलंय! आज प्रजासत्ताक दिनाच्या धामधुमीत जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी तातडीने इन्फेक्टेड झोन व निगराणी क्षेत्र घोषित करून संबंधित पोल्ट्रीसह बाधित क्षेत्रातील पक्षी, अंडी व खाद्याची केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे तातडीने विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील 21 दिवस बाधित केंद्रापासून 10 किलोमीटर अंतरातील कुक्कुट, अंडी व खाद्याची अन्यत्र वाहतूक करण्यात मनाईचे आदेश बजावले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती प्राधिकरणचे अध्यक्ष एस. रामामुर्ती यांनी आज 26 जानेवारीला, प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 आणि 2021 च्या सुधारित अधिनियम नुसार प्राप्त अधिकारद्वारे हे आदेश निर्गमित केले आहे. या गंभीर व खळबळजनक घडामोडींचा केंद्रबिंदू ठरलंय ते भानखेड ( ता. चिखली) आजवर खिजगणतीतही नसलेले गाव! तेथील जनार्धन दत्तू इंगळे यांच्या घरामागे असलेल्या ( ब्याकयार्ड) पोल्ट्रीमधील पक्षी दगावल्यावर 4 पक्षी परीक्षणासाठी भोपाळ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली, याचा तालुक्यात फैलाव होऊ नये म्हणून बाधित कोंबड्यांची तसेच 1 किलोमीटर परिसरातील पक्षी , अंडी, खाद्य यांची शास्त्रीय पद्धतीने ” कलिंग” करून तात्काळ विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले. पशुसंवर्धन चे उपायुक्त dr, पुंडलिक बोरकर यांच्या मार्गदर्शनात जलद कृती दल व विभाग यासाठी सज्ज झालाय! तसेच इंगळे यांच्या पोल्ट्री पासून 10 किलोमीटर त्रिज्येमधील पक्षी, अंडी खाद्य यांची पुढील 21 दिवस वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार आरडीसी दिनेश गीते प्रत्येक घडामोडीवर करडी नजर ठेवून असतानाच जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धनमध्ये समन्वयाची जबाबदारी सांभाळीत आहेत.

बर्ड फ्लू काय आहे? कशामुळे होतो?

हा विषाणूजन्य आजार आहे. इन्फ्लूएन्झा विषाणूचा पक्ष्यांमध्ये आढणारा प्रकार म्हणजे बर्ड फ्लू किंवा एव्हिअन फ्लू. फ्लूच्या विषाणूचे अनेक प्रकार आहेत. माणसाला फ्लू होतो ज्याला कॉमन फ्लू म्हटले जाते. तसेच पक्षी, डुक्कर, मांजर इतर प्राण्यांनाही फ्लूचा संसर्ग होतो. बर्ड फ्लू विशेषत: कुक्कुट, बदके यापासून प्रसारित होतो. १९९६ मध्ये चीनमध्ये या विषाणूची लागण झाली आणि १९९७ मध्ये हाँगकाँग येथे माणसांमध्ये याचा संसर्ग आढळला. त्यानंतर जवळपास पन्नास देशांत हा आजार पसरला. हा बर्ड फ्लू म्हणजे ‘एच ५ एन १’. पुन्हा २००३ आणि २००५ मध्ये याची साथ पसरली. त्यानंतर २०१३ मध्ये चीनमध्ये बर्ड फ्लूचा नवा प्रकार समोर आला तो म्हणजे ‘एच ७ एन ९’.

माणसांना होऊ शकतो का?

हा विषाणू झुनॉटिक म्हणजेच प्राणी-पक्ष्यांकडून माणसांमध्ये पसरणारा आहे. त्याचा विषाणू हवेतून पसरतो. त्याची लागण झाल्यास साधारण दोन ते आठ दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात. सर्दी, पडसे, खूप ताप काही वेळा श्वास घेण्यास त्रास, अतिसार अशी लक्षणे दिसतात. कुक्कुटपालन केंद्रात याची लागण झाल्यास अचानक मोठय़ा प्रमाणावर कोंबडय़ांचा मृत्यू होतो. त्यांच्या अंडय़ांचे कवच कमकुवत होते. पक्ष्यांच्या हालचालीत असमन्वय दिसतो. त्यांचे पाय निळे-जांभळे होऊ शकतात.

मेलेले किंवा जखमी पक्षी दिसल्यास काय करायचे? किंवा काय काळजी घ्यायची?

अचानक खूप मृत पक्षी दिसल्यास त्यांना हात लावू नये. योग्य यंत्रणेला त्याची माहिती द्यावी. यंत्रणा पोहोचेपर्यंत कुत्री, मांजरी किंवा इतर प्राणी त्यांना खाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मृत पक्षी उघडय़ा कचरापेटय़ांमध्ये न टाकता त्याची तातडीने विल्हेवाट लावावी. ते खोलवर पूरून टाकावेत किंवा जाळून नष्ट करावते. या विषाणूचा प्रादुर्भाव हा पोल्ट्रीमध्ये जास्त दिसतो. पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. घर किंवा परिसरात जखमी पक्षी दिसल्यास घाबरून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण नाही. प्रत्येक पक्षी हा बर्ड फ्लूमुळेच पडला असेल असे नाही. योग्य ती काळजी घेऊन त्यावर उपचार करावेत. त्यासाठी पक्षीप्रेमींना माहिती द्यावी. मृत कावळे दिसत असल्याचे नागरिक सांगत आहेत. प्राधान्याने हा पोल्ट्रीमधील आजार आहे. मात्र, कावळ्यांपर्यंत त्याचा प्रादुर्भाव पसरला आहे का याची खातरजमा करण्यासाठी यंत्रणांनी काही मृत कावळ्यांचे शवविच्छेदन करणे गरजेचे आहे. अनेकदा गुरांना डायक्लोफिनॅक दिले जाते. अशा मृत गुरांचे मांस खाल्ल्यावर कावळे, गिधाडे यांचा मृत्यू होतो. पक्ष्यांच्या संपर्कात आल्यावर काटेकोर स्वच्छता राखावी.

चिकन, अंडी यातून माणसाला प्रादुर्भाव होऊ शकतो का?

आपल्याकडे साधारणपणे चिकन शिजवूनच खाल्ले जाते. पूर्ण शिजलेले मांस, अंडी हे सुरक्षित असते. अधिक खबरदारीचा भाग म्हणून माहिती असलेल्या ठिकाणीच चिकन किंवा अंडी खरेदी करावी. अंडी घेतल्यानंतर साधारणपणे ती चांगली आहेत का हे अंडे पाण्यात टाकून पाहिले जाते. अंडे खराब आहे असे वाटल्यास खाऊ नये. पुरेशी काळजी घ्यावी मात्र, घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

घरातील प्राणी-पक्ष्यांची काळजी कशी घ्यावी?

बाहेरील पक्षी किंवा प्राण्यांच्या संपर्कात घरातील प्राणी किंवा पक्षी नसतील तर काळजी करण्याचे कारण नाही. कुत्री किंवा मांजरी बाहेर फिरताना काही खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरातील प्राण्यांवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याचे दाखले नाहीत. मात्र, प्राण्यांनाही कच्चे किंवा अर्धेकच्चे मांस, अंडी देणे टाळावे. प्रक्रिया केलेल्या अन्नातून कोणत्याही विषाणूची बाधा होत नाही. पक्ष्यांची योग्य निगा राखावी. त्यांच्यात खूप बदल झाला, त्यांच्या हालचाली मंदावल्या असतील, प्रतिसाद मंदावला असेल, नेहेमीचे खाणे सोडले असेल तर पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा.