बहुप्रतिक्षीत खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्‍या सर्वेक्षण अहवालाला मान्यता, अंतिम मंजुरीच्‍या हालचाली गतिमान!; पालकमंत्री, चिखलीच्‍या आमदार, जालन्याच्‍या खासदारांना जाते श्रेय!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बहुप्रतिक्षीत खामगाव – जालना रेल्वेमार्ग होण्यासाठी मिळत असलेले राजकीय पाठबळ फळाला येताना दिसत आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणाच्या सकारात्मक अहवालाला मध्य रेल्वेने मान्यता दिली आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाच्या अंतिम मंजुरीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वेचे मुंबई येथील पथक सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यात दाखल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बहुप्रतिक्षीत खामगाव – जालना रेल्वेमार्ग होण्यासाठी मिळत असलेले राजकीय पाठबळ फळाला येताना दिसत आहे. सहा महिन्‍यांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणाच्‍या सकारात्मक अहवालाला मध्य रेल्वेने मान्यता दिली आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाच्या अंतिम मंजुरीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या या रेल्वेमार्गाच्‍या सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वेचे मुंबई येथील पथक सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यात दाखल झाले होते. या पथकाचे प्रमुख सुरेशचंद्र जैन यांनी सांगितले, की पथकाने रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण केल्यानंतर हा मार्ग भारतीय रेल्वेसाठी आर्थिक दृष्ट्या फायद्याचा असेल असा सकारात्मक अहवाल तयार केला. हा अहवाल मध्य रेल्वेच्या प्रशासन समितीकडे पथकाने काही दिवसांपूर्वी सादर केला. महत्त्वाची बाब म्हणजे हा सकारात्मक अहवाल मध्य रेल्वेने स्वीकारला असून, लवकरच तो केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे, अशी माहिती जैन यांनी दिली.

खामगाव – जालना रेल्वेमार्गाचा विषय जालन्याचे खासदार तथा केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयर यांच्याकडे लावून धरला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी देखील राज्य शासनाकडे या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. याशिवाय रेल्वे लोकआंदोलन समितीच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून या प्रश्नावर सातत्याने संघर्ष सुरू आहे. या सर्व प्रयत्नांची एकत्रित फलनिष्पत्ती म्हणजे आज खामगाव – जालना रेल्वेमार्गाचा प्रवास ‘ सेमी फायनल’पर्यंत येऊन ठेपला असून अंतिम ध्येय आता दृष्टीपथास आले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे रेल्वे लोकआंदोलन समितीचे रेणुकादास मुळे यांनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितले.