बापरे रे बाप! आठवड्यातच 5114 पॉझिटिव्ह!! 4 तालुक्यांचा अर्धाधिक वाटा

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मार्चपासून जिल्ह्यात परत जोरदार मुसंडी मारणाऱ्या कोरोनाने 2020 मध्ये नवनवीन विक्रम केले अन् 2021 मध्ये सर्व रेकॉर्ड मोडून काढण्याचा चंग बांधला आहे की काय? असे भयावह चित्र जिल्हाभरात निर्माण झाले आहे. परिणामी केवळ आठवडाभरातच जिल्ह्यात 5 हजारांवर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यावर कळस म्हणजे यातील अर्धेअधिक पेशंट …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मार्चपासून जिल्ह्यात परत जोरदार मुसंडी मारणाऱ्या कोरोनाने 2020 मध्ये नवनवीन विक्रम केले अन्‌ 2021 मध्ये सर्व रेकॉर्ड मोडून काढण्याचा चंग बांधला आहे की काय? असे भयावह चित्र जिल्‍हाभरात निर्माण झाले आहे. परिणामी केवळ आठवडाभरातच जिल्ह्यात 5 हजारांवर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यावर कळस म्हणजे यातील अर्धेअधिक पेशंट केवळ 4 तालुक्यांतीलच आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोरील डोकेदुखी व आव्हाने खडतर झाल्याचे चित्र आहे.

मार्चमध्ये जोरदार पुनरागमन करणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यात धुमाकूळ घालत सर्व तालुके पादाक्रांत केले. बुलडाणा व खामगाव हे तालुके तर जवळपास 1 महिन्यापासून कोरोना हॉट स्पॉट ठरलेत! याशिवाय चिखली, मलकापूर, शेगाव, देऊळगावराजा हे डेंजर झोनमध्ये आहेत. इतर तालुके सुरक्षित आहेत असे नव्हे, पण या 6 तालुक्यांच्‍या तुलनेत ते सौम्य वाटतात. हाच काय तो फरक! मागील 27 मार्च ते 2 एप्रिल या जेमतेम 7 दिवसांच्या अल्प कालावधीत जिल्ह्यात तब्बल 5114 कोरोनाबाधित आढळले आहेत. या कालावधीत 518 ही सर्वात कमी रुग्णसंख्या 30 मार्च रोजी आढळली. त्याच्या 4 दिवसांपूर्वीच ऑल टाइम रेकॉर्ड असलेल्या 1130 पॉझिटिव्ह संख्येची नोंद झाली. या आठवड्यात रोज सरासरी 730  या वेगाने रुग्ण आढळून आलेत.

फिफ्टी-फिफ्टी

दरम्यान  जिल्ह्यातील या अवाढव्य आकड्यात केवळ 4 तालुक्यांचा अर्ध्या पेक्षा जास्तीचा वाटा राहिला आहे. बुलडाणा तालुक्यात आठवड्यातच तब्बल 1045 पॉझिटिव्ह आढळले. तालुक्याने 1 एप्रिल ( 226) व 27 मार्च (247) या दोन दिवशी द्विशतक ओलांडले. 29 मार्चला पावणे दोनशे तर 30 मार्चला सव्वाशेचा पल्ला गाठला होता! याच कालावधीत खामगावमध्ये 660 पॉझिटिव्ह निघाले. 28 तारखेला व त्यानंतर 30, 31 मार्च व 1 एप्रिल असे सलग 3  दिवस तालुक्यात शतकीय आकडे आलेत. चिखली तालुक्याची आकडेवारी 542 तर मलकापूरची 532 अशी आहे. 29 मार्चला 142 रुग्णांचा रेकॉर्ड करून तालुक्याने जिल्ह्याचे लक्ष वेधले. या 4 तालुक्यांचा एकूण 5114 रुग्ण संख्येत 55 टक्के इतका मोठा वाटा आहे.