बाहेर से कोई अंदर हा आ सके…. शेगावमध्ये ‘गुपचूप’ला पोलिसांचा दणका!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही काही व्यावसायिक या निर्बंधांना न जुमानत ‘गुपचूप’ व्यवसाय सुरूच ठेवत आहेत. एरवी बाहर से कोई अंदर ना आ सके..असे गाणे असले तरी, त्यात थोडा बदल शेगावमध्ये होताना दिसत असून, दुकान बंद असले तरी, आतमध्ये ग्राहक घेतल्यानंतर पुन्हा …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्‍ण वाढत असल्‍याने प्रशासनाने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही काही व्‍यावसायिक या निर्बंधांना न जुमानत ‘गुपचूप’ व्‍यवसाय सुरूच ठेवत आहेत. एरवी बाहर से कोई अंदर ना आ सके..असे गाणे असले तरी, त्‍यात थोडा बदल शेगावमध्ये होताना दिसत असून, दुकान बंद असले तरी, आतमध्ये ग्राहक घेतल्यानंतर पुन्‍हा शटर बंद होऊन जात असल्याचे दिसून येते. पोलिसांनी अशा कोरोनावाढीला जबाबदार व्‍यावसायिकांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली असून, गेल्या दोन दिवसांत 4 दुकानदारांविरुद्ध कारवाई केली आहे. यात मेन रोडवरील कृष्णा ज्‍वेलर्स, महालक्ष्मी कापड दुकान, गुरुनानक फॅशन व आर. आर. कलेक्‍शन या दुकानांचा समावेश आहे.

सहायक पोलीस निरिक्षक गौतम इंगळे, पोलीस उपनिरिक्षक योगेशकुमार दंदे यांच्‍या पथकांनी या कारवाया केल्या. 4 मे रोजी मेन रोडवरील गुरुनानक फॅशन व आर. आर. कलेक्‍शन ही दोन कापड विक्रीची दुकाने बाहेरून शटर बंद करून आतमध्ये ग्राहकी सुरू होती. पोलिसांच्‍या तपासणीत ही बाब समोर आली. यावरून दुकानमालक अनिल प्रकाश जमानी (रा. सिंधी कॉलनी, शेगाव) व योगेश सोहन मराठी (रा. सरस्वतीनगर, शेगाव) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. कृष्णा ज्‍वेलर्स 3 मे रोजी सकाळी साडेअकराच्‍या सुमारास उघडे होते. त्‍यावरून दुकानमालक अमरसिंग भवरीलाल वर्मा (52, रा. गुजराती हौसिंग सोसायटी, शेगाव) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकाँ मुरलीधर वानखडे करत आहेत.

महालक्ष्मी कापड दुकानाची गोपनीय माहितीवरून 4 मे रोजी सकाळी साडेनऊला तपासणी केली असता दुकानाचे बाहेरून शटर बंद असले तरी आतून दुकान सुरू होते. दुकानात ग्राहक व कर्मचारी दिसून आले. गंभीर म्‍हणजे कर्मचारी, ग्राहकांच्‍या तोंडाला मास्‍क नव्‍हता की सुरक्षित अंतरही ठेवलेले नव्‍हते. पीएसआय श्री. दंदे यांच्‍या तक्रारीवरून दुकानमालक ऋषी जयकुमार भाटे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. ही कारवाई डीबी पथकातील एएसआय लक्ष्मण मिरगे, पोलीस नाईक उमेश बोरसे, गणेश वाकेकर, पोलीस कॉन्‍स्‍टेबल विजय साळवे, हरिश्चंद्र बारवाल, प्रकाश गवांदे यांनी केली.