बिग ब्रेकिंग! टीबी हॉस्पिटलमध्ये लवकरच 80 बेड्सची सुविधा; अपंग विध्यालयात ऑक्सिजनयुक्त 100 बेड्सचे सीसीएच!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यासह जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप आणि बेड्सचा तुटवडा लक्षात घेता लवकरच बुलडाणा येथील अपंग विद्यालयात ऑक्सिजन सुविधायुक्त 100 बेड्सचे सीएचसी सुरू करण्यात येणार आहे तसेच टीबी हॉस्पिटलमध्ये 80 बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अपंग विद्यालयातील सीसीसी स्थानीय ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात स्थलांतरित व कार्यान्वित होणार …
 

 बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यासह जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप आणि बेड्सचा तुटवडा लक्षात घेता लवकरच  बुलडाणा येथील अपंग विद्यालयात ऑक्सिजन सुविधायुक्त 100 बेड्सचे सीएचसी सुरू करण्यात येणार आहे तसेच टीबी हॉस्पिटलमध्ये 80 बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अपंग विद्यालयातील सीसीसी स्थानीय ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात स्थलांतरित व कार्यान्वित होणार आहे.

जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या बुलडाणा तालुक्यातील कोरोनाचा धोका वाढतच असून शहरासह ग्रामीण भागात कोविडचा प्रादुर्भाव फैलावत आहे.  तसेच रुग्णाच्या उपचारासाठी बेड्सच्या तुटवड्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार रुपेश खंडारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित विषयावर तपशीलवार माहिती दिली. या अनौपचारिक चर्चेदरम्यान बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यानुसार एकेकाळी संपूर्ण विदर्भातच नव्हे राज्यात क्षय रोगावरील उपचारासाठी प्रसिद्ध बुलडाणा अजिंठा रोडवरील क्षय आरोग्यधामच्या इमारतीत कोरोना उपचारासाठी 80 बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. पैकी 40 बेड्‌स उपलब्ध ( कार्यान्वित) झाले असल्याचे तहसीलदार श्री. खंडारे यांनी सांगितले. तसेच सध्या याच परिसरातील अपंग विद्यालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित आहे. त्याजागी  आता  सुमारे आठवडाभरात कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात येणार आहे, तिथे ऑक्सिजन सुविधायुक्त 100 बेड्सची  सुविधा राहणार आहे. यासाठी आवश्यक तांत्रिक बदल व सुविधा उपलब्ध करण्यासाठी कमीअधिक  5 दिवस लागणार आहे. यामुळे गंभीर रुग्णांच्या उपचारातील मोठी अडचण दूर होणार आहे.

दरम्यान अपंग विद्यालयातील कोविड केअर सेंटर पोलीस मुख्यालय परिसरातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात शिफ्ट( स्थलांतरित) करण्यात येईल. तिथे 100 बेड्सची व्यवस्था राहणार असल्याचे श्री. खंडारे यांनी स्पष्ट केले. त्या ठिकाणी कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येईल, असे ते म्हणाले. या पर्यायी सुविधांमुळे उपचारांमधील अडचण व बेड्सच्या तुटवड्याचा प्रश्न निकाली काढण्यास मदत होणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.