बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायतींना निधी कमी पडू देणार नाही : मंत्री यशोमती ठाकूर

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्ह्याच्या संपर्कमंत्री तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. काँग्रेसतर्फे आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी त्या आज, 23 जानेवारीला दुपारी बोलत होत्या. चिखलीच्या मौनीबाबा संस्थानमध्ये हा कार्यक्रम झाला. पालकमंत्री डॉ. राजेंद्र म्हणाले, की ग्रामपंचायत ग्रामीण …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्ह्याच्या संपर्कमंत्री तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.


काँग्रेसतर्फे आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी त्या आज, 23 जानेवारीला दुपारी बोलत होत्या. चिखलीच्या मौनीबाबा संस्थानमध्ये हा कार्यक्रम झाला. पालकमंत्री डॉ. राजेंद्र म्हणाले, की ग्रामपंचायत ग्रामीण विकासाची गुरूकिल्ली असून, याचा सुयोग्य उपयोग करून गावाचा विकास साधला जाऊ शकतो. पंचायत राज व्यवस्थेमुळे गावातील ग्रामसभेला एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे की ग्रामसभेने पारीत केलेला ठराव सर्वोच्च न्यायालयालाही वगळता येत नाही. त्यामुळे तुमचा उत्साह कायम ठेवा, गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे व मंत्री ठाकूर यांच्या हस्ते बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार शाल, रूमाल व अभिनंदन पत्र देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे होते. आमदार राजेश एकडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मनिषाताई पवार, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. ज्योतीताई ढोकणे, जि. प. महिला सभापती सौ. ज्योतीताई पडघान यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्र संचालन गणेश शेळके यांनी केले. आभार डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी मानले.
असाही भावस्पर्शी सोहळा…


चिखलीजवळील गोद्री गावातील 8 वर्षीय कार्तिकी महाले या मुलीचे मातृ-पितृ क्षेत्र हरविल्याने तिची वयस्कर आजी तिचा सांभाळ करते. परंतु आजीची दयनीय अवस्था पाहता आजीलाही या मुलीचा सांभाळ करणे कठीणच. ही आजी कार्यक्रम स्थळी रडत होती व गर्दी पाहून ती परतही निघाली होती. परंतु हिंमत करून या आजीने मंत्री महोदया यशोमतीजी ठाकूर यांच्याशी स्टेजवर जाऊन परिस्थिती कथन केली. श्रीमती ठाकूर यांनी राहुल बोंद्रे यांना अनाथ मुलीसाठी काहीतरी करण्याचे सुचविले. श्री. बोंद्रे यांनी पुढाकार घेऊन हिरकणी महिला अर्बन बँक राबवत असलेल्या अनाथ पालक योजने अंतर्गत या 8 वर्षीय मुलीला दत्तक घेऊन तिच्या शिक्षण व उदरनिर्वाहासाठी 500 प्रतिमहा देण्याचे ठरवून याच कार्यक्रमात मंत्री महोदया समोरच त्याची घोषणा केली.