बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंत्याला लाथाबुक्क्यांनी बदडले!; बुलडाणा तालुक्यातील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना आज, २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता भादोला (ता. बुलडाणा) येथे घडली.
भादोला येथे महावितरणचे कर्मचारी वीजबिल वसुलीसाठी गेले होते.त्यावेळी भादोला येथील शेख जुबेर शेख अयुब (२५) याने वीजबिल भरले नसल्याने त्याचा वीजपुरवठा खंडित केला. त्यावेळी जुबेर याने कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली व कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता संजोग सातव यांना ही माहिती दिली.
त्यावरून सातव हे भादोला येथे गेले. त्यांनी कर्मचाऱ्यांना शिविगाळ करणाऱ्या व कामात अडथळा निर्माण करणाऱ्या जुबेरला समजाविण्याचा प्रयत्न केला असता जुबेरने अभियंता संजोग सातव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कर्मचाऱ्यांनी संजोग सातव यांची जुबेरच्या तावडीतून सुटका केली. घटनेची तक्रार देण्यासाठी अभियंता सातव यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले तेव्हा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.