बुलडाणा बसस्‍थानकावर दारूड्याचा राडा!; अडीच तास नुसता धिंगाणा, चौकशी कक्षाच्या काचा फोडल्या, कॉम्‍प्युटरचीही फेकझोक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा बसस्थानकावर दारूड्यांचा धिंगाणा काही नवीन नाही. दारू पिऊन गटारात लोळणारे दारूडे बसस्थानकावर पडून असतात. डुकरांच्या घोळक्यात लोळणाऱ्या एका दारुड्याचा अनुभवही बुलडाणा लाइव्हने वाचकांना यापूर्वी सांगितला होता. मात्र काल संडेच्या संध्याकाळी एका दारूड्याने कहरच केला. तब्बल अडीच तास त्याचा धिंगाणा सुरू होता. त्याच्या पुढे फक्त एसटी महामंडळाचे कर्मचारीच नव्हे तर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा बसस्थानकावर दारूड्यांचा धिंगाणा काही नवीन नाही. दारू पिऊन गटारात लोळणारे दारूडे बसस्‍थानकावर पडून असतात. डुकरांच्या घोळक्यात लोळणाऱ्या एका दारुड्याचा अनुभवही बुलडाणा लाइव्हने वाचकांना यापूर्वी सांगितला होता. मात्र काल संडेच्या संध्याकाळी एका दारूड्याने कहरच केला. तब्बल अडीच तास त्याचा धिंगाणा सुरू होता. त्याच्या पुढे फक्त एसटी महामंडळाचे कर्मचारीच नव्हे तर पोलीसही हतबल झाल्याचे दिसले. या दारूड्याने चौकशी कक्षाच्या काचा फोडल्या, कॉम्प्युटर ही फेकून दिले. त्यामुळे नियंत्रण कक्षातही गोंधळ उडाला होता. त्‍याचा धिंगाणा पाहण्यासाठी मोठी गर्दीही जमली; मात्र त्याचा रुद्रावतार पाहता त्याला रोखण्याची हिंमतही कुणाची झाली नाही.

शहरातील मिलिंदनगर भागात राहणारा ५५ वर्षीय हा दारूडा बायकोला माहेरी सोडण्यासाठी बुलडाणा बसस्थानकावर आला होता. मदिरा प्राशन केलेली असल्याने त्याचे बायकोसोबत भांडण झाले. त्‍याने तिथेच बायकोला मारझोड सुरू केली. नवरा- बायकोचा वाद मिटवण्यासाठी काही लोकांनी मध्यस्‍थीचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांकडेच त्‍याचा मोर्चा वळला. रागाच्या भरात दिसेल त्याला शिविगाळ त्‍याने सुरू केली. बसस्थानकावरील नियंत्रण कक्षासमोर येऊन त्याने तिथेही धिंगाणा घातला. नियंत्रण कक्षाच्या काचावर बुक्क्या मारून काच फोडली. कॉम्प्युटरही फेकून दिले. तिथल्या पोलीस चौकीत पोलीस हजर नव्हते. त्‍यामुळे बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू व काही पोलीस कर्मचारी बसस्थानकावर पोहोचले. त्‍यांनी दारूड्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणालाही जुमानत नव्हता. त्‍यामुळे पोलीसही त्याच्यासमोर हतबल झाल्याचे दिसून आले. अखेर त्‍याच्या भावाला याबद्दलची माहिती देण्यात आली. शेवटी त्‍याच्‍या भावानेच त्‍याला आवरले. भाऊ त्याला घरी घेऊन नेला. दारूड्याच्‍या हेकेखोरपणामुळे बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तो माजी सैनिक असल्याचे समजते. त्याची दोन मुलेही सैन्यात तर सूनही पोलीस विभागात नोकरीला असल्याचे समजते.