‘बुलडाणा लाइव्ह’चा ऑन दी स्‍पॉट रिपोर्ट : सतीश गुप्‍त यांच्‍यासोबत असा घडला सिनेस्‍टाइल थरार!; आधी कार लुटली, नंतर गुप्‍तांची इनोव्‍हा घेऊन पसार, पण अपघातामुळे झाले जेरबंद, एका दरोडेखोरासह दुचाकीस्वाराचा मृत्‍यू्‌, नशिब बलवत्तर म्‍हणून वाचले सतीश गुप्‍त अन्‌ पुरुषोत्तम दिवटे!!

बुलडाणा/औरंगाबाद (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीन दरोडेखोरांनी शुक्रवारी मध्यरात्री धुळे-सोलापूर महामार्गावर अक्षरश: धुमाकूळ घातला. चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त आणि उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे यांच्यावर दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला करून त्यांची कार आणि रोख रक्कम लुटून पोबारा केला. त्यानंतर या कारने एका दुचाकीस्वारास जांभळा गावाजवळ चिरडले. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तीन दरोडेखोरांच्या मुसक्या …
 
‘बुलडाणा लाइव्ह’चा ऑन दी स्‍पॉट रिपोर्ट : सतीश गुप्‍त यांच्‍यासोबत असा घडला सिनेस्‍टाइल थरार!; आधी कार लुटली, नंतर गुप्‍तांची इनोव्‍हा घेऊन पसार, पण अपघातामुळे झाले जेरबंद, एका दरोडेखोरासह दुचाकीस्वाराचा मृत्‍यू्‌, नशिब बलवत्तर म्‍हणून वाचले सतीश गुप्‍त अन्‌ पुरुषोत्तम दिवटे!!

बुलडाणा/औरंगाबाद (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीन दरोडेखोरांनी शुक्रवारी मध्यरात्री धुळे-सोलापूर महामार्गावर अक्षरश: धुमाकूळ घातला. चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त आणि उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे यांच्यावर दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला करून त्यांची कार आणि रोख रक्कम लुटून पोबारा केला. त्यानंतर या कारने एका दुचाकीस्वारास जांभळा गावाजवळ चिरडले. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यापैकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या योगेश राजदेव (रा. रामराई, ता. गंगापूर) या संशयित दरोडेखोराचा औरंगाबादच्या घाटी रुग्‍णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चंद्रकांत वसंतराव बोडखे (४२, रा. खिर्डी) असे दरोडेखोरांनी उडविलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. दरोडेखोरांच्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या गुप्त आणि दिवटे यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त व उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे हे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नांदगाव येथील शाखा सल्लागार समितीची बैठक आटोपून औरंगाबाद येथे मुक्कामी निघाले होते. औरंगाबादपासून २५ किलोमीटर अंतरावर त्यांची गाडी अडवून दरोडा घालण्यात आला. गुप्त यांच्या वाहन चालकाने प्रतिकार करताच चालकासह सतीश गुप्त आणि दिवटे यांच्यावर दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला चढवला. तसेच गाडीमधील पैसे, रिव्हॉल्व्हर, काडतूस व इनोव्हा गाडी दरोडेखोरांनी पळवून नेली. या तीन दरोडेखोरांनी गुप्त यांना लुटण्यापूर्वी अन्य एका कारचालकाला अडवून लुटले. हे तिघे दुचाकीवर आले होते. डोणगाव येथील रहिवासी केवलसिंग धरमसिंग सुलाने हे कार घेऊन औरंगाबाद – देवगाव रस्त्यावर असलेल्या पिंपळगाव दिवशी मार्गावरून घराकडे जात होते.

त्यांच्‍या कारला (क्र. एमएच २० डीव्ही ४२४५) दरोडेखोरांनी दुचाकी आडवी लावून थांबवले. दरवाजा उघडायला लावून बुक्क्यांनी मारहाण करत त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून कारमधून उतरवले. त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावून त्‍यांच्याच कारमध्ये बसून निघून गेले. गाडी घेऊन हे दरोडेखोर देवगाव- शिरूरमार्गे पाणपोई येथे गेले. तेथून परत औरंगाबादच्या दिशेने परत आले. तोपर्यंत केवलसिंग यांनी ग्रामस्थांमार्फत शिल्लेगाव पोलिसांना माहिती दिली होती. दरम्यान, त्यामार्गे गस्तीवर असलेले पोलीस पथक, शिल्लेगाव पोलीस आदींनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. पोलीस आपला पाठलाग करत असल्याने आरोपींनी वरझडी फाट्याजवळ त्यांच्या ताब्यात असलेली कार ही समोरून येणाऱ्या सतीश गुप्त यांच्या इनोव्हाला (क्र. एमएच २० बीएन १८५७) आडवी लावत त्यांना थांबायला भाग पाडले. दरोडेखोरांनी दांड्याने इनोव्हा कारमधील बुलडाणा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे व चालक किशोर इंगळे यांना जबर मारहाण करून जखमी केले व त्यांच्या ताब्यातील इनोव्हा कार घेऊन पुढे धुळे-सोलापूर महामार्गावरून भरधाव गेले.

दुचाकीस्वारास उडवले
फतियाबादच्या पुढे माळीवाड्याजवळ असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली या दरोडेखोरांनी कार घातली. या मार्गावरून दुचाकीने जात असलेले चंद्रकांत बोडके यांना जोरदार धडक दिली. यात ते जागीच ठार झाले तर पुढे असलेल्या डंपरला मागून दरोडेखोरांची कार आदळल्याने ती बंद पडली. यात संशयित दरोडेखोर योगेश राजदेव हा गंभीर जखमी झाला. पाठलाग करत असलेल्या पोलिसांनी तिन्ही दरोडेखोरांना ताब्यात घेतले. अपघातात जखमी झालेल्या योगेश राजदेव याला घाटीत हलवले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार बोडखे यांचा मृतदेहदेखील घाटीत हलविण्यात आला आहे.

सुटकेसमधील रोख व रिव्हॉल्व्हर सुरक्षित
चिखली अर्बन बँकेचे चेअरमन सतीश गुप्त यांच्या कारमध्ये दोन लोडेड रिव्हॉल्व्हर होत्या. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या सुटकेसमध्ये रोख रक्कमही होती. दरोडेखोरांच्या हाती सीटखाली ठेवलेली रिव्हॉल्व्हर आणि सुटकेस लागली नसल्याने सुटकेसमधील रोख रक्कम आणि दोन्ही रिव्हॉल्व्हर सुरक्षित आहेत. तसेच या सुटकेसला पासवर्ड असलेले लॉक असून सुटकेस गुप्त यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केल्याची माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.