बुलडाणा लाइव्‍ह विशेष! कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या बेफिकीऱ्यांना बसला 31 लाखांचा दंड तरी सुधरेनाच!; 13 नगरपरिषदा, 2 नगरपंचायती मालामाल!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असताना, यात नागरिकांकडूनही सक्तीने काही नियम पाळून घेतले जात आहेत. मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दी न करणे आदी नियम वारंवार सांगूनही पाळले जात नसल्याने अशा बेफिकीर लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईतून मोठी गंगाजळी स्वतःहून …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्‍हणून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असताना, यात नागरिकांकडूनही सक्‍तीने काही नियम पाळून घेतले जात आहेत. मास्‍क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दी न करणे आदी नियम वारंवार सांगूनही पाळले जात नसल्‍याने अशा बेफिकीर लोकांविरुद्ध दंडात्‍मक कारवाई केली जात आहे. या कारवाईतून मोठी गंगाजळी स्‍वतःहून नागरिक नगरपरिषद, नगरपंचायतीला उपलब्‍ध करून देत आहेत. जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींनी 31 लाखांवर दंड वसुली करण्याची ‘रोख’ठोक कामगिरी बजावल्याचे बुलडाणा लाइव्‍हच्‍या समोर आले आहे.

गेल्‍या वर्षी २२ मार्चपासून विविध टप्प्यांत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पालिका कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने बेजबाबदार नागरिक, दुकानदार, लघु व्यावसायिक यांना वठणीवर आणले. दिवाळीपर्यंत ही कामगिरी बजावणारे हे कर्मचारी पुन्हा कालपरवापासून दंडात्मक कारवाई करताना दिसत आहेत. या दीर्घ कालावधीत व काल 19 फेब्रुवारीपर्यंत 13 स्थानिक स्वराज्य संस्थांनी (नगर परिषद व नगर पंचायती) या मोहिमेत 31 लाख, 22 हजार 620 रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी महेश वाघमोडे यांनी बुलडाणा लाईव्हला ही माहिती दिली. यामध्ये सर्वाधिक दंड अर्थातच मास्क न घालण्यात भूषण मानणाऱ्या आडमुठ्या वाहनचालक व पादचारी नागरिकांना ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून 12 लाख 24 हजार 570 रुपये वसूल करण्यात आला. सुरक्षित अंतराच्‍या नियमाचे पालन न करणाऱ्यांकडून 7 लाख 63 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला. लॉकडाऊन काळात दुकाने सुरू ठेवण्याच्या ठराविक वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या. या वेळेचे पालन न करणाऱ्या लहानमोठ्या दुकानदारांकडून 3 लाख 1 हजार 800 तर दरपत्रक ( रेटबोर्ड) न लावणाऱ्यांकडून 1 लाख 59 हजार रुपये वसुलण्यात आले. याशिवाय सार्वजनिक स्थळी पिचकाऱ्या मारणाऱ्या व थुंकणाऱ्याकडून 1 लाख 72 हजार 670 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

बुलडाणा पालिका आघाडीवर
दरम्यान 13 संस्थांमध्ये मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील बुलडाणा पालिका 7 लाख 45 हजार 200 रुपये दंडासह जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. थुंकणाऱ्याकडून 1.57 लाख, मास्क न लावणाऱ्यांकडून 2 लाख, अंतर न राखणाऱ्यांकडून सव्‍वा लाख, वेळेवर दुकाने बंद न करणाऱ्यांकडून 2 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. चिखली पालिका 5. 33 लाखांसह दुसऱ्या तर मोताळा नगर पंचायतने 4.92 लाख रुपये वसुलीसह तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी बजावली. संग्रामपूर नगर पंचायत ( वसुली 27 हजार ) यात शेवटून पहिली आहे.