बुलडाण्यातील अतिक्रमण हटाव मोहीम ४ सप्‍टेंबरपर्यंत लांबणीवर! लघु व्यावसायिकांना तात्पुरता दिलासा!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात बुलडाणा नगर परिषदेने कठोर कारवाईची जय्यत तयारी केली आणि ३१ ऑगस्टपासून त्याची सुरुवात करण्याचे नियोजन आले असतानाच नाट्यमय घडामोडीनंतर ही मोहीम येत्या शनिवारपर्यंत लांबणीवर पडली! एका नेत्याच्या हस्तक्षेपानंतर ही कारवाई थांबविण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळासह शहरात होत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरातील मुख्य …
 
बुलडाण्यातील अतिक्रमण हटाव मोहीम ४ सप्‍टेंबरपर्यंत लांबणीवर! लघु व्यावसायिकांना तात्पुरता दिलासा!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात बुलडाणा नगर परिषदेने कठोर कारवाईची जय्यत तयारी केली आणि ३१ ऑगस्टपासून त्याची सुरुवात करण्याचे नियोजन आले असतानाच नाट्यमय घडामोडीनंतर ही मोहीम येत्या शनिवारपर्यंत लांबणीवर पडली! एका नेत्याच्या हस्तक्षेपानंतर ही कारवाई थांबविण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळासह शहरात होत आहे.

जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी लघु व्यावसायिकांकडून मनमानी पद्धतीने अतिक्रमणे करण्यात आली आहेत. यामुळे रहदारीस अडथळे होत असून, शहराला बकाल स्वरूप येत आहे. यामुळे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमण धारकांना नुकत्याच नोटीस बजावल्या. त्यांना दोन दिवसांत आपली दुकाने हटवून घेण्याची तंबी देण्यात आली. ते व्यवसाय करत असलेल्या जागांवर नाल्या आदी विकासकामे करावयाची असल्याने हे न केल्यास म्युनिसिपल कायद्याच्या कलम १७९ अन्वये थेट कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

यात चिखली रोड, जांभरून रोड, जिल्हाधिकारी( डीएसपी) कार्यालय रोड, मुख्य बाजारपेठेमधील जैस्वाल चौक ते स्वागत मेडिकल जवळची सार्वजनिक मुतारी दरम्यानच्या अतिक्रमण धारकांचा समावेश आहे. मात्र दुकानदारांनी नोटिसांना फारशी भीक न घातल्याने अखेर पालिकेने अतिक्रमण काढण्याची तयारी केली आहे. थेट कारवाईसाठी ३१ ऑगस्ट हा मुहूर्त आणि जांभरून रोड हा प्रारंभीचा स्पॉट निर्धारित करण्यात आला. यामुळे या टप्प्यातील अतिक्रमणधारकांत खळबळ उडाली. मात्र त्यानंतर त्यांनी आपले गाऱ्हाणे मांडल्यावर एका नेत्याने मध्यस्थी केल्याने ही कारवाई ४ सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली. यानंतर मात्र काय होते, नेत्याची मध्यस्थी कायम राहून व्यावसायिकांवरील गंडांतर टळते की सोयीस्कर मार्ग काढून पालिका अतिक्रमणे हटवते(च) याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.