बुलडाण्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित! ICU यूमधील पेशंटला थेट मिळणार प्राणवायू

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ऐन कोरोना प्रकोपाच्या काळात एखाद्या वरदानासारखे मिळालेला बुलडाणा येथील ऑक्सिजन जनरेशन प्लांट आज, 27 एप्रिलला हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर कार्यान्वित झाला आहे. काही तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाल्यावर लवकरच या संयंत्रातील प्राणवायूचा वापर सुरू होणार असल्याने एकाच वेळी ऑक्सिजनचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार असून गंभीर रुग्णांसाठी हा प्रकल्प …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ऐन कोरोना प्रकोपाच्या काळात एखाद्या वरदानासारखे मिळालेला बुलडाणा येथील ऑक्सिजन जनरेशन प्लांट आज, 27 एप्रिलला हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर कार्यान्वित झाला आहे. काही तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाल्यावर लवकरच या संयंत्रातील प्राणवायूचा वापर सुरू होणार असल्याने एकाच वेळी ऑक्सिजनचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार असून गंभीर रुग्णांसाठी हा प्रकल्प प्राणरक्षक ठरणार आहे.

यापूर्वी थेट केंद्र शासनाकडून मिळालेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे साहित्य, उपकरणे घेऊन आलेले वाहन 21 एप्रिलला बुलडाणा नगरीत दाखल झाले होते. यासोबत आलेल्या 2 तज्‍ज्ञ अभियंत्यांनी स्थानीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आठवडाभरातच हा प्लांट उभारला. आज 27 एप्रिलला तो कार्यान्वित झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना ही गूड न्यूज दिली. हे संयंत्र हवेतील ऑक्सिजन शोषून ते साठविते. याची क्षमता  80 जम्बो सिलिंडर इतकी आहे. हवेतील प्राणवायू (ऑक्सिजन) शोषून घेऊन तो साठवून ठेवायची क्षमता या प्रकल्पात आहे. यातील ऑक्सिजन थेट आयसीयूमधील (अर्थात गंभीर स्वरूपाच्या, शरीरातील प्राणवायूची पातळी कमी झालेल्या) रुग्णांना पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. तडस यांनी सांगितले. या प्रकल्पातील ऑक्सिजन परिक्षणासाठी पाठविण्यात  येणार असून, त्यातील प्राणवायूचे प्रमाण व पृथक्‍करण करण्यात येईल, याचा अहवाल आल्यावर लवकरच याचा वापर सुरू करणार असल्याचे सीएस श्री. तडस यांनी स्पष्ट केले.