बुलडाण्यातील दोन प्रसिद्ध हॉस्पिटलच्‍या 3 कर्मचाऱ्यांकडून रेमडेसिवीरचा काळाबाजार!; ‘एलसीबी’ने आवळल्‍या मुसक्‍या!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील दोन प्रसिद्ध हॉस्पिटलच्या 3 कर्मचाऱ्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने आज, 7 मे रोजी सायंकाळी पकडले. यातील दोघांना जांभरूण रस्त्यावरून तर एकाला येळगाव फाट्यावरून उचलण्यात आले. या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून, इंजेक्शनचा काळाबाजार कशा पद्धतीने होतो हेही एकप्रकारे समोर आले आहे. या प्रकारात हॉस्पिटल्सच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील दोन प्रसिद्ध हॉस्पिटलच्‍या 3 कर्मचाऱ्यांना रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा काळाबाजार करताना बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने आज, 7 मे रोजी सायंकाळी पकडले. यातील दोघांना जांभरूण रस्‍त्‍यावरून तर एकाला येळगाव फाट्यावरून उचलण्यात आले. या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून, इंजेक्‍शनचा काळाबाजार कशा पद्धतीने होतो हेही एकप्रकारे समोर आले आहे. या प्रकारात हॉस्पिटल्‍सच्‍या व्‍यवस्‍थापनाचा तूर्त तरी सहभाग नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र हॉस्पिटलला जिल्हा प्रशासनाकडून पुरविण्यात आलेल्या इंजेक्‍शनना अशा प्रकारे कर्मचारी परस्‍पर विकतात तरी कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

लद्धड आणि मेहेत्रे अशी या हॉस्पिटलची नावे सूत्रांकडून समजतात. पैकी आज उद्धड हॉस्पिटलला प्रशासनाने सर्वाधिक 45 आणि मेहेत्रे हॉस्पिटलला 17 रेमडेसिवीरचे वितरण केले होते. राम गडख (रा. येळगाव), लक्ष्मण तरमळे (रा. पिंपळगाव सराई, ता. चिखली), संजय इंगळे (रा. हतेडी, ता. बुलडाणा) अशी पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्‍यांच्‍याकडून 9 रेमडेसिवीर व 7 मेरोपेनॉम इंजेक्शन जप्‍त करण्यात आले. मेरोपेनॉम हे इंजेक्शनसुद्धा कोविड व निमोनियाच्या आजारात वापरले जात असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. एकूण 16 इंजेक्शन, 7 हजार रुपये नगदी, 2 मोटारसायकली, 3 मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे. बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेकडून या प्रकरणात चौकशी सुरू आहे. आणखी काही जण या काळ्याबाजारात समोर येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

काळाबाजार करणाऱ्यांची खैर नाही…

कोरोनाने जिल्ह्यातील परिस्‍थिती अत्‍यंत बिकट केली आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्यानंतर त्‍याचे वितरण थेट प्रशासनाकडूनच हॉस्पिटल्सना करण्यात येत आहे. मात्र त्‍यातही आता काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. मात्र अशा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेनेही कंबर कसली असून, नांदुऱ्यात मोठी कारवाई केल्यानंतर आज बुलडाण्यात केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे काळाबाजार करणाऱ्यांना धसका बसला आहे.

जिल्ह्यातील रुग्णालयांना 522 रेमडेसिवीरचे वितरण

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत आज, 7 मे रोजी 522 रेमडेसिवीर इंजेक्‍शनचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्‍या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. रुग्णालयांना बेड व रुग्णसंख्येनुसार वितरण केलेले रेमडेसिवीर असे ः  बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 45 इंजेक्शन, मेहेत्रे हॉस्पीटल 17, रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 8, जाधव पल्स हॉस्पीटल 7, सहयोग हॉस्पीटल 6, आशीर्वाद हॉस्पीटल 13, सिद्धीविनायक हॉस्पीटल 17, काटकर हॉस्पीटल 3, शिवसाई हॉस्पीटल 10, संचेती हॉस्पीटल 15, सोळंके हॉस्पीटल 9, खरात हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 4, सुश्रुत हॉस्पिटल 6, कोठारी हॉस्पीटल 3, न्यू लाईफ कोविड हॉस्पीटल 5, चिखली : योगीराज हॉस्पीटल 30, हेडगेवार हॉस्पीटल 15, गुरूकृपा हॉस्पीटल 5, तायडे हॉस्पीटल 14, दळवी हॉस्पीटल 9, पानगोळे हॉस्पीटल 14, खंडागळे हॉस्पीटल 7, गंगाई हॉस्पीटल 7, जैस्वाल हॉस्पीटल 7, ओम गजानन हॉस्पिटल 7, तुळजाई हॉस्पिटल 3, सावजी हॉस्पीटल 15, अनुराधा मेमोरियल 0, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 7, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 3, मुरलीधर खर्चे हॉस्पिटल 10, आशीर्वाद हॉस्पीटल 6, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 22, शेगाव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 16, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 9 , शामसखा हॉस्पीटल 4, खामगाव : आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 18, चव्हाण 5, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 14, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 17, मापारी हॉस्पीटल 6, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 5, गोविंद क्रिटीकल 5, श्री. गजानन हॉस्पीटल 15, अजंता हॉस्पीटल 5, मेहकर मल्टीस्पेशालीटी 14, राठोड हॉस्पिटल 2, देऊळगाव राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 5, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 9, मी अँड आई हॉस्पीटल 4, सिंदखेड राजा : जिजाऊ हॉस्पीटल 12, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 11, असे एकूण 91 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र पुरवठा झालेल्या इंजेक्शनची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शनचा पुरवठा सुध्दा रुग्णालयांना करण्यात आला आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रुग्णांकरिताच प्राधान्याने वापरण्यात यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळविले आहे.