बुलडाण्यातील व्‍यापाऱ्यांचा पालकमंत्र्यांना घेराव; ‘साहेब आम्‍हाला वाचवा…’ टाहो ऐकून पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेचे दिले आश्वासन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊनचा हा फार्स व्यापाऱ्यांच्या मुळावर उठणारा असून, आम्ही मानसिक रुग्ण होऊ. आमचे परिवार जगणार नाहीत, असा टाहो व्यापाऱ्यांनी आज, 6 एप्रिलला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांसमोर फोडला. लॉकडाऊन करायचे तर पूर्णच बंद करा. केवळ दुकाने बंद करून कोरोना जाणार नाही, असा उद्वेग यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. त्यावर पालकमंत्र्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर हे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊनचा हा फार्स व्‍यापाऱ्यांच्‍या मुळावर उठणारा असून, आम्‍ही मानसिक रुग्‍ण होऊ. आमचे परिवार जगणार नाहीत, असा टाहो व्‍यापाऱ्यांनी आज, 6 एप्रिलला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांसमोर फोडला. लॉकडाऊन करायचे तर पूर्णच बंद करा. केवळ दुकाने बंद करून कोरोना जाणार नाही, असा उद्वेग यावेळी व्यापाऱ्यांनी व्‍यक्‍त केला. त्‍यावर पालकमंत्र्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर हे निर्बंध असून, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, असे सांगितल्‍याचे व्‍यापाऱ्यांच्‍या प्रतिनिधींनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितले.

अत्‍यावश्यक सेवा वगळता दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. त्‍यामुळे आधीच कर्जाचा डोंगर वाढत असलेले व्‍यापारी हवालदिल झाल्याचे आज पहायला मिळाले. सिंदखेड राजात व्‍यापाऱ्यांनी रस्‍त्‍यावर उतरून तहसीलदारांना निवेदन दिल्याचे वृत्त असतानाच, बुलडाण्यातही व्‍यापाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या ठिकाणी पालकमंत्र्यांना घेराव घालत व्‍यापाऱ्यांनी आपली बाजू मांडली. दुकाने बंद असली तरी लोक रस्‍त्‍यावर फिरत आहेत, गर्दी करत आहेत, वाहतूकही पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्‍यामुळे कोरोना कमी होणार नाही तर वाढेल, असे व्‍यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. शनिवार, रविवारचा लॉकडाऊन आम्‍ही मान्य केला. पण आता 30 एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवणे आम्‍हाला उपाशीपोटी मारणारे आहे. आधीच गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे व्‍यवसाय ठप्प आहेत. बँकांचे हप्‍ते थांबलेले नाहीत. अनेकांची दुकाने भाड्याची आहेत. त्‍यांचेही भाडे सुरूच आहे. अशा वेळी प्रशासन आणि सरकारने आम्‍हाला दिलासा देण्याची गरज आहे. काही तासांची सवलत दुकाने उघडण्यासाठी द्यावी, अशी मागणी व्‍यावसायिकांनी यावेळी केली. सतिश कोठारी, अजय भारती, आनंद संचेती, दिलीप कोठारी, शुभम कोठारी, गौरव कोठारी, टिकम वाधवाणी, दिलीप पर्याणी, अजय भारती, गजानन टेकाळे, सनी परयानी, कृष्णा खुराणा, बंटी छाजेड, आकाश दिवटे, शंकर मंगतानी, दीपक पंजवाणी यांच्‍यासह अनेक व्यापारी यावेळी उपस्‍थित होते.