बुलडाण्यातून अपहरण करून पुण्यात नेत तरुणीवर तीन महिने बलात्‍कार!; अश्लील व्हिडिओ दाखवून करायचा अत्‍याचार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याच्या टीबी हॉस्पिटलसमोरील उतारावरून अपहरण करून ३० वर्षीय तरुणीला पुण्यात नेले. तिथे एका फ्लॅटवर ठेवत तीन महिने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. बुलडाणा शहर पोलिसांनी जोहरनगर येथील चौघांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तरुणावर वारंवार अत्याचार तर इतर तिघांवर अपहरणात त्याला मदत केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. अश्लील …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याच्‍या टीबी हॉस्पिटलसमोरील उतारावरून अपहरण करून ३० वर्षीय तरुणीला पुण्यात नेले. तिथे एका फ्‍लॅटवर ठेवत तीन महिने तिच्‍यावर वारंवार लैंगिक अत्‍याचार करण्यात आला. बुलडाणा शहर पोलिसांनी जोहरनगर येथील चौघांविरुद्ध या प्रकरणी गुन्‍हा दाखल केला असून, तरुणावर वारंवार अत्‍याचार तर इतर तिघांवर अपहरणात त्‍याला मदत केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. अश्लील व्हिडिओ दाखवून आपल्यावर अमानवीय अत्‍याचार केल्याचेही तिने म्‍हटले आहे.

पीडिता जोहरनगरातील रहिवासी असून, शेजारी राहणारा आसिफ चौधरी तिच्‍यावर अनेक दिवसांपासून वाईट नजर ठेवून होता. त्‍याने छेड काढल्याची तक्रारही तिने पोलिसांत केली होती. ६ जानेवारीला दुपारी दीडच्‍या सुमारास ती बचतगटाचे पैसे मिळणार असल्याने धाड नाक्‍याकडे पायीच जात होती. तेव्‍हा टीबी हॉस्पिटलसमोरील उतारावर एक स्विफ्‍ट डिझायर कार अचानक तिच्‍यासमोर थांबली. कारमध्ये आसिफ चौधरी, रमजान चौधरी, चांद चौधरी, सत्तार चौधरी (सर्व रा. जोहरनगर, बुलडाणा) बसलेले होते. आसिफने कारचा दरवाजा उघडून जबरदस्‍ती तिला कारमध्ये ओढले. तोंडावर कपडा बांधून हात बांधून तिला गाडीच्‍या सीटखाली टाकून दिले. कारने तिला पुण्यातील चंदननगरमधील एका अपार्टमेंटच्‍या फ्‍लॅटवर नेले. तेथे एका खोलीत बंद करून टाकले.

नंतर रमजान, चांद आणि सत्तार हे निघून गेले. आसिफ तिथेच थांबला. त्‍याने चाकूचा धाक दाखवत, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत सलग तीन महिने तिच्‍यावर रोज लैंगिक अत्‍याचार केला. मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून अमानवीय लैंगिक अत्‍याचारही केला. तरुणी बेपत्ता झाल्याने तिच्‍या आईने सगळीकडे शोध घेतल्यानंतर बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात मुलीच्‍या अपहरणाची तक्रार केली. ही माहिती आसिफला कळताच त्‍याने पीडित तरुणीला २० मार्चला बुलडाण्यात आणून सोडले. पीडिता लैंगिक अत्‍याचार, अपहरणाची तक्रार देण्यासाठी पोलिसांत जात असताना आसिफने तिला थांबवून लग्‍न करण्याचे आश्वासन दिले. त्‍यामुळे तिने तक्रार दिली नाही. मात्र त्‍याने आजपर्यंत लग्‍न केले नाही. त्‍यामुळे तरुणीने काल, २२ जूनला बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून आसिफ आणि त्‍याच्‍या साथीदारांविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे.