बुलडाण्यात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित; पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांची माहिती

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाविरुद्धच्या दीर्घ लढाईत ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात येत आहेत. आज, १५ मे रोजी येथील महिला रुग्णालयातील समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित झाल्याची अनौपचारिक घोषणा डॉ. शिंगणे यांनी केली. आज शनिवारी प्लांटचा उद्घाटन …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाविरुद्धच्या दीर्घ लढाईत ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्‍नांतून उभारण्यात येत आहेत. आज, १५ मे रोजी येथील महिला रुग्णालयातील समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित झाल्याची अनौपचारिक घोषणा डॉ. शिंगणे यांनी केली.

आज शनिवारी प्लांटचा उद्घाटन समारंभ ठेवण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही औपचारिकता टाळून प्रकल्पाची पाहणी करत हा प्लांट कार्यान्वित झाला असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. हवेतून ऑक्सिजन शोषून सुमारे 80 जम्बो सिलिंडरमध्ये साठवून त्यातून किमान 75 पेशंटला प्राणवायू पुरविण्याची क्षमता या प्लांटमध्ये असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्याला रोज जवळपास १६ मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. आता या प्लांटव्दारे ८० जम्बो सिलींडर इतका ऑक्सिजन २४ तासांत उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा वापर न करता, थेट प्लांटपासून रुग्णांच्या बेडला ऑक्सिजन पाइपलाईन अटॅच करून रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येईल. देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर व इतरही ठिकाणी प्लांट लवकरच उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या कोरोना लाटेच्या शक्यतेमुळे राज्य स्वयंपूर्ण होत असताना बुलडाणा जिल्हा देखील सर्वार्थाने स्वंयपूर्ण करणार असल्याचा विश्वास डॉ. शिंगणे यांनी व्‍यक्‍त केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, डॉ. वासेकर, डॉ. प्रशांत पाटील, नायब तहसीलदार सुनील आहेर, मुख्याधिकारी महेश वाघमोडे हजर होते.