बुलडाण्यात काँग्रेसची निदर्शने; केंद्र सरकारच्‍या प्रतिकात्‍मक पुतळ्यावर काढला राग!, आ. एकडे, सानंदा, सपकाळ यांची आंदोलनाकडे पाठ

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्रातील मोदी सरकारच्या 7 वर्षांतील कारभाराविरोधात जिल्हा काँग्रेस समितीने बुलडाण्यात आज, 31 मे रोजी सकाळी निदर्शने केली. जयस्तभं चौकात मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निषेधाचे निवेदनही देण्यात आले. जिल्हास्तरीय आंदोलन असल्याने सर्व नेत्यांनी एकजूट दाखविण्याची गरज असताना आमदार राजेश एकडे, खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि बुलडाण्याचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः केंद्रातील मोदी सरकारच्‍या 7 वर्षांतील कारभाराविरोधात जिल्हा काँग्रेस समितीने बुलडाण्यात आज, 31 मे रोजी सकाळी निदर्शने केली. जयस्तभं चौकात मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निषेधाचे निवेदनही देण्यात आले. जिल्हास्‍तरीय आंदोलन असल्याने सर्व नेत्‍यांनी एकजूट दाखविण्याची गरज असताना आमदार राजेश एकडे, खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

देशात बेरोजगारी वाढली. मोदी सत्तारूढ असेपर्यंत विकास शक्य नाही. मोदी हैं तो नामुमकीन हैं… असा घणाघात यावेळी काँग्रेस जणांनी केला. कोरोना महामारी व इंधन दरवाढ रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले. शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध केला. आंदोलनात जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई शेळके, उल्हास भुसारे, रमेश कायंदे, शिवदास रिंढे, विष्णू पाटील कळसुंदर, अनिल शर्मा, गजेंद्र माणे आदी सहभागी झाले होते.

पाठ फिरवण्यामागे खदखद?
जिल्हा काँग्रेसने या आंदोलनाची तयारी केल्याने जिल्ह्यातील किमान प्रमुख काँग्रेस नेत्यांनी आंदोलनात हजर राहणे अपेक्षित होते. मात्र मलकापूरचे आमदार राजेश एकडे, खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसले. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षांविरोधात काही नेते व कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र होते. आजच्या या आंदोलनात नेमक्या त्यांनीच पाठ फिरवल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा होती.