बुलडाण्यात कोरोनाच्‍या मर्यादेतही यंदाची शिवजयंती अभूतपूर्व ठरणार

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) ः महाराष्ट्राचे दैवत व अस्मिता, हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा यंदाचा बुलडाणा शहरातील जयंती उत्सव सोहळा कोरोनाच्या मर्यादेतही अभूतपूर्व ठरणार असून बसस्थानक परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन थाटात पार पडणार असल्याचे प्रतिपादन बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे यंदा आयोजित सोहळ्याची माहिती देण्याकरिता आज, …
 

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) ः महाराष्ट्राचे दैवत व अस्मिता, हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा यंदाचा बुलडाणा शहरातील जयंती उत्सव सोहळा कोरोनाच्या मर्यादेतही अभूतपूर्व ठरणार असून बसस्थानक परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन थाटात पार पडणार असल्याचे प्रतिपादन बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.
छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे यंदा आयोजित सोहळ्याची माहिती देण्याकरिता आज, 15 फेब्रुवारी रोजी आमदार संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्‍यांनी ही माहिती दिली. समितीचे अध्यक्ष मृत्युंजय संजय गायकवाड, सचिव अनिल रिंढे, गायत्री सावजी, शैलेश खेडेकर, रवी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आमदार गायकवाड यांनी विविध कार्यक्रमांची रूपरेषा स्पष्ट करीत शासनाने कोरोना विषयक लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करणार असल्याचे सांगितले. विविध देखावे यंदाचे आकर्षण ठरणार आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सोशल सुरक्षित अंतराचे पालन करण्यात येईल. तसेच भव्य शोभायात्रेचा मार्ग पालिकेच्या साहाय्याने सॅनिटायझ करण्यात येईल. प्रत्येक व्यक्ती आणि 100 जणांच्या गटामध्ये सामाजिक अंतर राखण्यावर भर राहणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केले. जाहीर कार्यक्रमांच्या व्यासपीठावर पदाधिकारी व अधिकारी यांची गर्दी करण्याऐवजी सर्व समाजाच्या अध्यक्षांना सन्मानपूर्वक स्थान देण्याचे नियोजन आहे. शिवरायांच्या मावळ्यात जसा सर्व जाती धर्माचा समावेश होता. त्याच धर्तीवर हे नियोजन आखण्यात आल्याचे आमदारांनी विशद केले. बुलडाणा बस स्थानक परिसरातील छत्रपतींच्या नियोजित भव्य पुतळ्याचा पायाभरणी सोहळा ठरल्याप्रमाणे 22 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता पार पडणार असून 14 मे रोजीच्या सोहळ्यास छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे यांच्यासह विविध मान्यवरांची हजेरी राहणार असल्याचे आमदारांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी अनिल रिंढे यांनी कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. उद्या 16 फेब्रुवारीला नगर परीषद शाळा क्रमांक 2 मध्ये आयोजित रांगोळी स्पर्धेने कार्यक्रमांना सुरुवात होईल. तसेच निबंध, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे गायत्री सावजी यांनी सांगितले. समिती अध्यक्ष मृत्युंजय गायकवाड यांनी गांधी भवनात संध्याकाळी 6 वाजता आयोजित विशेष कार्यक्रमाची माहिती दिली. 17 फेब्रुवारीला गीतांजली झेंडे यांचे शिवचरित्र व आजची पिढी यावरील व्याख्यान, 18 फेब्रुवारीला मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम होणार आहे. 19 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता पारंपरिक शिवजन्मोत्सव, शिवरायांचा पाळणा, समूहगान हे उपक्रम पार पडतील , असे समिती अध्यक्षांनी सांगितले .