बुलडाण्यात कोविड रुग्णांसाठी जम्बो हॉस्पिटल उभारणार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे वाढते रुग्ण बघता प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या साथरोगावर नियंत्रणासाठी व रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी बुलडाणा शहरात 500 खाटांचे जम्बो हॉस्पिटल उभारण्यात यावे. त्यासाठी जागा बघून यंत्रणेने प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली. कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक 18 मार्च …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः कोरोनाचे वाढते रुग्ण बघता प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या साथरोगावर नियंत्रणासाठी व रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी बुलडाणा शहरात 500 खाटांचे जम्बो हॉस्पिटल उभारण्यात यावे. त्यासाठी जागा बघून यंत्रणेने प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.

कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक 18 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. त्‍यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील देऊळगाव राजा, मलकापूर, खामगाव व शेगाव येथे ऑक्सीजन टँक उभारण्याच्या सूचना करत पालकमंत्री म्हणाले, की या ठिकाणी कोविड रुग्णांची संख्या बरीच असते. त्यामुळे या चारही ठिकाणी शासकीय रुग्णांलयामध्ये ऑक्सीजन टँकची उभारणी करण्यात यावी. जेणेकरून तेथील रुग्णांना गरजेनुसार तातडीने ऑक्सीजन उपलब्ध करून देता येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये कॉर्डीयाक रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी. त्यासाठी प्रस्ताव तयार करून मंजुरातीसाठी पाठवावा. जिल्ह्यात पुढील रुग्णसंख्या वाढ लक्षात घेता ऑक्सीजन बेड व अन्य आरोग्यविषयक सुविधा तयार ठेवाव्या. गर्दी होणारे कार्यक्रम, लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही ते म्‍हणाले. हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालयासाठी मनुष्यबळाचा आकृतीबंध तयार करून पाठवावा. त्याला मंजुरात घेता येईल. सध्या कोविड तपासणीचा वेग चांगला आहे. त्यासाठी कॅम्प घेणे, सुपर स्प्रेडरचा शोध घेणे आदी कारणे महत्वाची आहेत. तपासण्यांचा वेग कमी होऊ देऊ नका. याच धर्तीवर आता लसीकरणासाठी काम करावे. कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचा अवलंब करत शिबरे आयोजित करून लसीकरण करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय लसीकरणाचा आढावा नियमितरित्या घेण्यात यावा. तसेच सर्व जनतेने मास्क वापरणे, हात वारंवार धुणे व गर्दीत जाणे टाळणे या त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे. यावेळी पालकमंत्री यांनी तालुकानिहाय आढावा घेतला.

‘बुलडाणा लाइव्‍ह’ची दखल

‘जिल्ह्यात रेमेडेसिवीर इंजेक्‍शनची चढ्या दराने विक्री; रुग्‍णांची आर्थिक लूट’ असे वृत्त बुलडाणा लाइव्‍हने चार दिवसांपूर्वी दिले होते. या वृत्ताची दखल घेत पालकमंत्र्यांनी कोविड रुग्णांवर प्रभावी असलेले रेमेडेसिवीर इंजेक्शनचे दर नियंत्रणात ठेवावे. या इंजेक्शनचे दर 1100 ते 1200 रुपयादरम्यान नियंत्रणात ठेवावे, असे निर्देश यावेळी यंत्रणेला दिले.

पालकमंत्र्यांनी बोथाकाजी आरोग्य केंद्राला दिली अकस्मात भेट

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी 17 मार्च 2021 रोजी खामगाव तालुक्यातील बोथाकाजी प्राथमिक आरोग्य केंद्राला अकस्मात भेट दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आरोग्य व्यवस्थांची पाहणी केली. तसेच लसीकरण कक्षामध्ये लसींचा साठा, सुरू असलेले लसीकरण याबाबत माहिती पालकमंत्री यांनी घेतली. लसीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता आणून लसीकरणाचा वेग वाढविण्याचा सूचना यावेळी पालकमंत्री यांनी दिल्या. येथील बाह्य रूग्ण विभाग, आंतर रूग्ण विभाग, औषध भांडार आदींचीही पाहणी केली. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.