दोन मटन दुकानदारांत गिऱ्हाईकीवरून वाद; एकाने खुपसला दुसऱ्याच्या छातीत सुरा! बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गिऱ्हाइकावरून दोन मटन दुकानदारांमध्ये वाद झाला. यात एका दुकानदाराने दुसऱ्याच्या छातीत सुरा खुपसला. ही घटना काल, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारला बुलडाणा शहरातील आठवडे बाजारातील मटन मार्केटमध्ये घडली. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरा छातीत घुसल्याने गंभीर जखमी मोहम्मद दानिश मोहम्मद सलीम (२५,रा. इकबाल …
 
दोन मटन दुकानदारांत गिऱ्हाईकीवरून वाद; एकाने खुपसला दुसऱ्याच्या छातीत सुरा! बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गिऱ्हाइकावरून दोन मटन दुकानदारांमध्ये वाद झाला. यात एका दुकानदाराने दुसऱ्याच्या छातीत सुरा खुपसला. ही घटना काल, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारला बुलडाणा शहरातील आठवडे बाजारातील मटन मार्केटमध्ये घडली.

बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरा छातीत घुसल्याने गंभीर जखमी मोहम्मद दानिश मोहम्मद सलीम (२५,रा. इकबाल चौक, बुलडाणा) याच्‍यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्याचे वडील व जुडवा भाऊ आठवडे बाजारातील मटन मार्केटमध्ये मटन विक्रीचा व्यवसाय करतात.भावाला मदत करण्यासाठी तो दुकानावर गेला होता. दुपारी साडेचारच्‍या सुमारास त्यांच्या दुकानावर आलेल्या गिऱ्हाईचा हात शेजारी मटनाचे दुकान असणाऱ्या मोहम्मद मतीन याने पकडला व त्याच्‍या दुकानावर घेऊन गेला.

तेव्हा हे आमचे गिऱ्हाईक आहे याला तिकडे का घेऊन जातो, असे दानिश म्हटला. यामुळे दानिश आणि मतीनमध्ये वाद झाला. तेव्हा मतीनचा मुलगा मुजाहिदने हातात मटन कापण्याचा सुरा घेऊन दानिशच्या छातीवर वार केले. मुजाहिदचा साथीदार अलीमने सुद्धा दानिशच्या पाठीवर व मांडीवर वार केले. यामुळे दानिश गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत दानिशला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या जबाबावरून मोहम्मद मुजाहिद मोहम्मद मतीन, मोहम्मद मतीन मोहम्मद नजीर व शेख अलीम शेख सलीम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.