बुलडाण्यात पकडलेले “ते’ रेमडीसीवीर नकलीच; मुंबईवरून सॅम्पलचा अहवाल प्राप्त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील लद्धड आणि मेहेत्रे हॉस्पिटलमधील ३ कर्मचाऱ्यांना ७ मे २०२१ रोजी बोगस रेमडेसिवीर विकताना एलसीबी पथकाने अटक केली होती. तिघांविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून इंजेक्शनचे नमुने ड्रग कंट्रोल लॅबोरेटरी, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बुलडाणा कार्यालयाला प्राप्त …
 
बुलडाण्यात पकडलेले “ते’ रेमडीसीवीर नकलीच; मुंबईवरून सॅम्पलचा अहवाल प्राप्त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील लद्धड आणि मेहेत्रे हॉस्पिटलमधील ३ कर्मचाऱ्यांना ७ मे २०२१ रोजी बोगस रेमडेसिवीर विकताना एलसीबी पथकाने अटक केली होती. तिघांविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून इंजेक्शनचे नमुने ड्रग कंट्रोल लॅबोरेटरी, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल अन्‍न व औषध प्रशासन विभागाच्‍या बुलडाणा कार्यालयाला प्राप्त झाला आहे. पकडण्यात आलेले इंजेक्शन बोगस असल्याचे तपासणीत समोर आले. त्यामुळे इंजेक्शनच्या कुपीत सलाईनचे पाणी भरून कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राम गडाख (रा. येळगाव), लक्ष्मण तरमळे (रा. पिंपळगाव सराई, ता. चिखली), संजय इंगळे (रा. हतेडी, ता. बुलडाणा) अशा तिघांना ७ मे रोजी एलसीबी पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडून ९ रेमडेसिवीर इंजेक्शन व ७ मेरोपेनॉम इंजेक्शन असे एकूण १६ इंजेक्शन, ७ हजार रुपये रोख, दोन मोटारसायकली, ३ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आरोपी इंजेक्शनच्या कुपीत सलाईनचे पाणी भरून त्याची १५ ते २० हजार रुपयांत विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. काही दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर सध्या तिन्ही आरोपी जामीनावर होते. मुंबईला तपासणीसाठी पाठवलेल्या सॅम्पलचा अहवाल ११ ऑक्टोबर रोजी प्राप्त झाला. अहवालाची माहिती शहर पोलीस स्टेशनला देण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई पोलीस विभागातर्फे करण्यात येईल, अशी माहिती अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक गजानन गिरके यांनी बुलडाणा लाइव्हला दिली.