बेजबाबदार नागरिकांना ठोठावला साडेपाच लाखांचा दंड!; बुलडाणा नगरपालिकेची कारवाई

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना निर्देश व नियमांचे पालन न करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना बुलडाणा नगरपालिकेने साडेपाच लाख रुपयांचा दंड ठोठावून वठणीवर आणले. यात मास्क न घालता स्वतःसह इतरांनाही कोरोनाचा धोका निर्माण करणाऱ्या निलाजऱ्या शहरवासीयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. कोरोना रोखण्यासाठी बुलडाणा पालिका शर्थीचे प्रयत्न करत असून, विविध उपाययोजना करत आहे. मात्र …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना निर्देश व नियमांचे पालन न करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना बुलडाणा नगरपालिकेने साडेपाच लाख रुपयांचा दंड ठोठावून वठणीवर आणले. यात मास्क न घालता स्वतःसह इतरांनाही कोरोनाचा धोका निर्माण करणाऱ्या निलाजऱ्या शहरवासीयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

कोरोना रोखण्यासाठी बुलडाणा पालिका शर्थीचे प्रयत्न करत असून, विविध उपाययोजना करत आहे. मात्र बेजबाबदारपणे वागून ‘काय होते पाहून घेऊ’ असा विचार करत मनमानी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यासाठी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभरात 9 पथके गठीत करण्यात आली आहेत. या कारवाईचे समन्वयक म्हणून पालिका अधीक्षक एकनाथ गोरे तर पथक प्रमुख म्हणून पराग सुळे, श्री. मेश्राम, आशिष फोकाटे, प्रकाश केसकर, गजानन चिंचोले, संदेश मोरे, डिगंबर साठे, अमोल इंगळे, राजेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकांनी मागील 1 जानेवारी ते आज, 25 मे दरम्यान नाठाळ रहिवाशांकडून 5 लाख 59 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्क न घालणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर म्हणजे 1 लाख 91 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक व व्यापाऱ्यांकडून 3 लाख 2 हजार 200 रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय सोशल डिस्टन्‍सिंगचे पालन न करणाऱ्यांकडून 52 हजार तर सार्वजनिक स्थळी थुंकणाऱ्यांना 13 हजार 300 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.