बेपत्ता बायको, चिमुकल्यांचा शोध पोलीस घेत नाहीत म्‍हणून हवालदील पतीने गाठले ‘बुलडाणा लाइव्‍ह’चे कार्यालय!; का टाळताहेत चिखली पोलीस जबाबदारी?, गूढ उकलणार?

माझी बायको, मुले शोधून द्या हो साहेब..!; हवालदील पतीचा टाहो, चिखली पोलिसांना फुटेना पाझर!!; प्रकरण संशयास्पदबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः त्यांचं लग्न झालं ७ वर्षांपूर्वी. ६ वर्षांची मुलगी, २ वर्षांचा मुलगा अशी संसाररुपी वेलीवर फुलेही फुलली… पण नियतीला हे सर्व चांगलं चाललेलं बहुतेक मान्य नसावे…आणि त्यांच्या संसाराला नजर लागली… कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर माहेरी घेऊन जातो …
 

माझी बायको, मुले शोधून द्या हो साहेब..!; हवालदील पतीचा टाहो, चिखली पोलिसांना फुटेना पाझर!!; प्रकरण संशयास्पद
बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः
त्‍यांचं लग्‍न झालं ७ वर्षांपूर्वी. ६ वर्षांची मुलगी, २ वर्षांचा मुलगा अशी संसाररुपी वेलीवर फुलेही फुलली… पण नियतीला हे सर्व चांगलं चाललेलं बहुतेक मान्य नसावे…आणि त्‍यांच्‍या संसाराला नजर लागली… कुटुंब नियोजनाच्‍या शस्‍त्रक्रियेनंतर माहेरी घेऊन जातो असे म्‍हणून तिच्‍या माहेरच्‍यांनी तिला घरी नेलं… पण तिथून तिचे पाऊल बाहेर पडले ते कदाचित परत न येण्यासाठी… माहेराहून ती चिमुकल्यांसह गायब झाली आहे. आईच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली. पण पुढे तपास शून्य आहे… दुसरीकडे हवालदील पती मात्र वेगळाच आरोप करतोय. त्‍याच्‍या आरोपानुसार तिच्‍या आईनेच तिचे दुसरे लग्‍न लावून दिले असून, तिने बायको आणि आपल्या चिमुकल्यांना गायब केल्याचा आरोप त्‍याने केला आहे. तो चिखली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला असता, त्‍याची तक्रार न घेता केवळ जबाब लिहून घेण्यात आला. त्‍यामुळे यात चिखली पोलिसांची भूमिकाही आश्चर्यस्‍पद आहे.

प्रवीण बारकू सोनोने (३८) असे या पतीचे नाव आहे. तो बलवाडी (ता. वरला, जि. बडवानी (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहे. प्रवीणने आज सकाळी दहालाच बुलडाणा लाइव्‍हचे कार्यालय गाठले आणि आपबिती मांडली. त्‍याने सांगितले, की सात वर्षांपूर्वी त्‍याचे लग्‍न किन्होळा (ता. चिखली) येथील गंगाराम पुंजाजी कांबळे यांची मुलगी सपना हिच्‍यासोबत बलवाडी (मध्यप्रदेश) येथे झाले होते. त्‍यांना मेघना (६) व पार्थ (२) अशी अपत्‍ये आहेत. दोन महिन्यांपूर्वी शेंदवा (ता. मध्यप्रदेश) येथे सपनाची कुटुंब नियोजन शस्‍त्रक्रिया झाल्याने भेटीसाठी त्‍याची सासू व विनोद खरात नावाचा व्‍यक्‍ती आले होते. त्‍यांनी सपनाला आम्‍ही आरामाकरिता घेऊन जातो असे म्‍हणून सोबत नेले. सपना ही दोन्‍ही मुलांसह आईसह किन्होळा येथे आली. त्‍यानंतर ती परतलीच नाही. ७ जूनला दुपारी सपनाच्‍या आईने प्रवीणला कळवले की २ जून रोजी सपना मुलांसह कुठेतरी निघून गेली आहे. त्‍यानंतर प्रवीणने किन्होळा गाठून सपनाचा नातेवाइक व इतर ठिकाणी शोध घेतला पण ती आणि मुले मिळून आली नाहीत. आजपर्यंत त्‍यांचा पत्ता लागलेला नाही.

प्रकरणाचे गौडबंगाल…
या घटनेत आणखी एक चक्रावणारा प्रकार समोर आला आहे. प्रवीणने सांगितले, की २७ मे रोजी (म्‍हणजे बेपत्ता होण्याच्‍या चार दिवसांआधी) सौ. सपनाने तिच्‍या मोबाइलवरून प्रवीणला कॉल केला. तेव्‍हा ती म्‍हणाली, की मला तुमच्‍यासोबत राहायचे नाही. मला तुमच्‍यापासून फारकती पाहिजेत. तुम्‍हाला मुले भेटणार नाहीत. माझी आई माझे दुसरे लग्‍न लावून देणार आहे. याबाबत प्रवीणने साला अजयला विचारले असता ताे ताईला विचारतो असे म्‍हणाला. त्‍यानंतर त्‍यानेही कॉल उचलला नाही, असे प्रवीणचे म्‍हणणे आहे. त्‍यानंतर ३१ मे रोजी दुपारी प्रवीण पत्‍नीला आणण्यासाठी किन्होळा येथे आला. तेव्‍हा पत्‍नी सपना व मुले घरी हजर होती. सायंकाळी सासू-सासऱ्यांनी सांगितले की आम्‍ही मुलीला आणि मुलांना कपडे घेऊन ८ दिवसांनी तुमच्‍याकडे पाठवून देतो. सध्या तिला काही नेऊ नका. त्‍यामुळे दुसऱ्या दिवशी बलवाडीला परतल्याचे प्रवीणने सांगितले. त्‍यानंतर मात्र त्‍याची बायको आणि मुले आश्चर्यस्पदरित्‍या बेपत्ता झाली आहेत. या घटनाक्रमामुळे प्रवीणला सासू, सासरे व साल्यावर संशय आहे. त्‍यांनीच माझ्या पत्‍नीचे दुसरे लग्‍न लावून दिले असावे, असा आरोप त्‍याने केला आहे. तसा जबाबही त्‍याने चिखली पोलिसांत दिला आहे. या प्रकरणाबाबत चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांनी प्रकरणाचा तपास सुरू असल्‍याचे सांगितले.

दीड महिन्यात ८० महिला, तरुणी जिल्ह्यातून बेपत्ता
जिल्ह्यातून महिला, तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक प्रकरणांत केवळ हरवल्याची नोंद घेऊन तपास सुरू आहे, असा सूर ऐकविण्यात येतो. यंत्रणेने या घटनांच्‍या मुळाशी जाण्याची गरज असून, बेपत्ता होण्याचे गौडबंगाल नक्‍की आहे तरी काय, हे समोर येण्याची गरज आहे. अवघ्या दीड महिन्‍यात जिल्ह्यातून तब्‍बल ८० महिला, तरुणी बेपत्ता झाल्याचे पोलिसांच्‍याच रेकॉर्डला नोंद आहे.