बोलेरो कारने दुचाकीस्वार पती-पत्नीला चिरडले, दोन वर्षीय चिमुकली सुखरुप!; खामगावजवळील घटना

खामगाव/नांदुरा (ज्ञानेश्वर ताकोते/प्रविण तायडे/भागवत राऊत) ः बोलेरो कारने दुचाकीला उडवले. यात पती जागीच ठार तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यासोबतची दोन वर्षीय चिमुकली मात्र सुखरूप आहे. ही घटना खामगाव- पिंपळगाव राजा रस्त्यावरील घाटपुरी शिवारातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ आज, 10 जानेवारीला सकाळी 9 च्या सुमारास घडली. जगदीश महादेव मुंढे (30) व लक्ष्मी जगदीश मुंढे (25, दोघे रा. …
 

खामगाव/नांदुरा (ज्ञानेश्‍वर ताकोते/प्रविण तायडे/भागवत राऊत) ः बोलेरो कारने दुचाकीला उडवले. यात पती जागीच ठार तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यासोबतची दोन वर्षीय चिमुकली मात्र सुखरूप आहे. ही घटना खामगाव- पिंपळगाव राजा रस्त्यावरील घाटपुरी शिवारातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ आज, 10 जानेवारीला सकाळी 9 च्या सुमारास घडली.

जगदीश महादेव मुंढे (30) व लक्ष्मी जगदीश मुंढे (25, दोघे रा. ढोरपगाव, ता. खामगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत, तर त्यांची मुलगी श्रद्धा (2) किरकोळ जखमी झाली. मुुंढे दाम्पत्य ढोरपगाव येथून शेगाव तालुक्यातील जवळा येथे लग्नाला चालले होते. घाटपुरीजवळ दुचाकी येताच जलशुद्धीकरण केंद्राजवळ त्यांना बोलेरोने उडवले. धडक इतकी जोरात होती की दुचाकीस्वार जगदीश यांचा जागीच मृत्यू झाला. पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले. चिमुकली श्रद्धा सुखरूप बचावली. लक्ष्मी यांना तातडीने खामगाच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र नेतानाच त्यांचा मृत्यू झाला पिंपळगाव राजा पोलिसांनी बोलेरो चालकाला अटक केली आहे. मृतक भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न पाटील यांची नातू व नात सून होती. या घटनेमुळे ढोरपगाव गावावर शोककळा पसरली आहे.

श्रद्धाला पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू…

चिमुकली श्रद्धा भीषण अपघातातून वाचली. मात्र तिचे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात आई-वडील निपचित पडलेले होते. यावेळी श्रद्धा मात्र शांत उभी राहून सर्व पाहत होती. तिच्या चेहर्‍यावरील ते भाव पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तिला मदत कार्य करणारी मंडळी तुझे गाव कोणते, तुझ्या वडिलांचे नाव काय, अशी जुजबी माहिती विचारत होते. मात्र तिला काहीच सांगता येत नव्हते.