ब्रिटिश राजवटीपासून कागदोपत्रीच धावणार्‍या खामगाव -जालना रेल्वे मार्गाचे नव्याने सर्वेक्षण! रेल्वे मंडळाचे पथक बुलडाणा, जालना जिल्ह्यात दाखल

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः थेट ब्रिटिशांच्या विदेशी राजवटीपासून ते स्वातंत्र्य प्राप्तीपासूनच्या पाऊणशे दशकांत केवळ आणि केवळ कागदोपत्रीच धावणार्या व प्रत्येक लोकसभा निवडणुकीतला जुमला ठरलेला खामगाव -जालना रेल्वेमार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लालफितशाहीत वर्षानुवर्षे दाबून अधूनमधून वर तोंड काढणार्या या मार्गाचे आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी रेल्वे …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः थेट ब्रिटिशांच्या विदेशी राजवटीपासून ते स्वातंत्र्य प्राप्तीपासूनच्या पाऊणशे दशकांत केवळ आणि केवळ कागदोपत्रीच धावणार्‍या व प्रत्येक लोकसभा निवडणुकीतला जुमला ठरलेला खामगाव -जालना रेल्वेमार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लालफितशाहीत वर्षानुवर्षे दाबून अधूनमधून वर तोंड काढणार्‍या या मार्गाचे आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी रेल्वे मंडळाचे एक पथक बुलडाणा, जालना जिल्ह्यात दाखल झाले आहे. 8 तारखेपर्यंत मुक्कामी असणारे हे पथक ( नेहमीप्रमाणे!) आपला अहवाल रेल्वे मंत्र्यांना सादर करणार आहे.

खासदार प्रतापराव जाधव, जालन्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. यामुळे रेल्वे मंडळ हलले! नवीन वर्षात 5 जानेवारीच्या मुहूर्तावर 2 वाहतूक निरीक्षक, 1 एससई यांचा समावेश असलेले हे पथक 8 जानेवारीपर्यंत पाहणी दौर्‍यावर राहणार आहे. आज सकाळी जालना स्थानकावर अधिकार्‍यांशी चर्चा केल्यावर पथकाने रेल्वेस्थानक, बाजार समिती, बाजारपेठेची पाहणी केली. यानंतर सवडीप्रमाणे हे पथक पुढे सरकत बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली येथील तहसील, खामगावच्या नवीन स्थानक, बाजारपेठेची पाहणी करणार आहे. या जोडीला दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, व्यापारी व उद्योजकांचे शिष्टमंडळ, तहसीलदार, जिल्हा उद्योग केंद्र, एसटी महामंडळाचे अधिकारी, बाजार समित्यांचे पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा करणार आहे. मागासलेल्या मराठवाडा व विदर्भाला कमी खर्चात व कमी अंतराने जोडण्याची क्षमता असलेला हा 162 किलोमीटरचा मार्ग तब्बल 75 वर्षांपासून कागदोपत्री रखडला. लोकसभा निवडणुकांत खमंग भाषणांचा विषय ठरला.

निवडणुकीपुरते मुद्दा उचलायचा. यूज अँड थ्रो पद्धतीने बासनात गुंडाळायचा ही परंपरा व अलिखित नियम प्रत्येक खासदाराने कटाक्षाने पाळला. सर्वच बाबतीत मतभेद असणार्‍या लोक प्रतिनिधींनी या बाबतीत तुझ्या माझ्या गळा या पद्धतीने ही उज्ज्वल (!) परंपरा जतन केली. त्यामुळे जुन्या जाणत्या पिढीसाठी वाचून ठेवून द्यायची आश्‍चर्यकारक बातमी ठरलीय! आश्‍चर्यकारक यासाठी की लोकसभेचे विलक्षण इलक्षण नसताना जालना- खामगावचा नवीन पार्ट कसा काय रिलीज झाला? हा प्रश्‍न त्यांना पडला आहे. नवीन पिढी,कार्यकर्ते यांना कौतुकाचा, विकास पर्व वगैरेचे शब्दयुद्ध सोशल मीडियावर फिरवायचा मोठा इश्यू मिळाला आहे. ब्रिटिशांची राजवट संपली म्हणून हा मार्ग अस्तित्वात आला नाही असे इतिहास सांगतो. अन्यथा त्यांना त्या काळात अब्जावधी कमवून देणार्‍या कॉटन बेल्टमधील हा मार्ग किमान 70 वर्षे जुना झाला असता. आजवरच्या देशी राजवटींनी केवळ फिजीबल नाही या निरर्थक मुद्यावर हा प्रकल्प दडवून ठेवण्याचे पाप केले आहे.